
समाजप्रबोधनकार निवृत्त महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करु नये, या मागणीसाठी जामखेड येथील भक्ती-शक्ती महोत्सव समितीच्यावतीने वारकर्यांसह मंगळवारी जामखेड तहसील कार्यालयावर टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला.
कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ जामखेड येथील भक्ती-शक्ती महोत्सवाच्यावतीने मंगळवारी जामखेड तहसील कार्यालयावर कार्यकर्ते व वारकर्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करु नये. इंदुरीकर महाराज महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तीमत्व आहे. समाजातील काही समाजकंटक त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाच्या वतीने तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी दिपक महाराज गायकवाड यांनी मोर्चात सांगितले की, धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदुरीकर महाराज बोलत आहेत, इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात जे दाखले देत आहेत ते ग्रंथांच्या आधारेच देत आहेत. तृप्ती देसाई यांनी महाराजांना त्रास देण्याचे काम करु नये. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाल तर वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भक्ती-शक्ती महोत्सवाचे अध्यक्ष सोमनाथ पोकळे, रामायण समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, हभप दिपक महाराज गायकवाड, स्वागताध्यक्ष समितीचे अध्यक्ष व नगरसेवक अमित चिंतामणी, मातोश्री कंस्ट्रक्शनचे अध्यक्ष अभिमन्यू पवार, अॅड. प्रविण सानप, गोरख घनवट, अण्णा मांजरे, दत्तात्रय सोले, उत्कर्ष कुलकर्णी, ओंकार झेंडे, हरिदास गुंड, शुभम राळेभात,संतोष गिरी, विवेक नेटके, संदिप बारस्कर, सुरेश पवार, माधव पवार, शिवाजी माने यांच्यासह वारकरी उपस्थित होते.



























































