
>> विवेक दिगंबर वैद्य
सेवाकार्यापासून प्रारंभ करीत ‘संत’पदापर्यंत पोहोचलेल्या ‘माऊली’ काशीबाई चव्हाण यांच्या जीवनकार्याचा हा परिचय.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील भूगांवात धोंडो राघो अपंडकर आणि सौ. उमाबाई हे सत्शील दांपत्य त्यांच्या हरिभाऊ, चंद्रा, भागूबाई, काशीबाई आणि धाले या पाच अपत्यांसह राहात होते. अपंडकरांच्या सरळमार्गी कुटुंबाला त्यांच्या प्रापंचिक आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अवघड आणि कष्टप्रद मार्गावरून वाटचाल करावी लागली, मात्र त्यांच्यातील काशीबाई यांनी तर त्याहून अधिक अवघड अशा परमार्थाची अतिशय बिकट वहिवाट निवडली आणि हीच ‘वाट’ त्यांना सद्गुरूपदापर्यंत नेती झाली हे विशेष महत्त्वाचे आहे.
‘दिव्यत्वाची प्रचीती’ देणारी ही कहाणी सन 1901 मध्ये जन्मलेल्या गुरुमाऊली काशीबाई चव्हाण यांची आहे. श्री स्वामी समर्थांच्या संप्रदायाला आधारभूत मानणारे थोर सिद्धसत्पुरुष श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर आणि त्यांचे उत्तराधिकारी श्रीनामदेव महाराज केळकर या दोन दिग्गज विभूतींकडून प्राप्त झालेला ‘अध्यात्माचा वसा’ माऊली काशीबाई चव्हाण यांनी केवळ निष्ठsने, मायेने आणि प्राणपणानेच जोपासला नाही तर तो वृद्धिंगत करीत सर्वाभिमुखही केला. सर्वोत्तम शिष्या, आदर्श गुरूभगिनी, कुशल संघटक, उत्तम व्यवस्थापक तसेच दीनदुबळ्यांची तारणहार आणि संकटकाळी मायेने जवळ घेणारी माऊली येथपासून भक्तांचा आधारवड म्हणून सर्वत्र प्रसिद्धीला आलेले ‘सद्गुरूतत्त्व’ इथपर्यंतचा माऊली काशीबाई चव्हाण यांचा प्रवास सर्वसामान्यास प्रभावित आणि अचंबित करणारा आहे.
अपंडकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. घरामध्ये धोंडोपंत एकटेच कमवणारे होते. थोरला हरी मुंबईस नोकरी करून जमेल तसे पैसे पाठवीत असला तरी संसारात अधूनमधून उपासमारीचे दिवस डोकावत असत. दोघांच्या पैशात नीटसे भागत नसे म्हणून मुलीदेखील घरकामाला मदत करत. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणीही शाळेचा उंबरठा ओलांडला नसल्याने कुणालाही शिक्षणाचा गंध नव्हता आणि अक्षरओळखही नव्हती. भल्यापहाटे उठून काही मैल अंतर दूरवर चालत जाऊन लाकडे आणणे. गवताच्या वरंडी आणून रचणे, क्वचितप्रसंगी आजूबाजूच्या घरी ‘धुणीभांडी’ करणे. कुणाच्याही अडीनडीला धावून जात पोटापुरते धान्य वा वस्तू गोळा करणे या व अशा अनेक प्रपंचपूरक उद्योगामध्ये गुंतलेल्या या मुली एकेक करून विवाहबद्ध झाल्या अन् त्यांच्या प्रपंचात रमल्या. काशीबाईदेखील घोटभर पेज, फणसाच्या गऱयांची भाजी, उकडीचा भात असे जे काही ताटात पडेल ते निमूटपणे घशाखाली ढकलून कामधंदा करीत, प्रपंचाला हातभार लावत होत्या. पुढे धोंडोपंतांचे निधन झाले आणि मुळातच अवघड असलेली ही प्रपंचवाट काशीबाईंकरिता अधिक बिकट झाली.
थोरले बंधू हरिभाऊ यांच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी आली तेव्हा त्यांनी आपला प्रपंच सांभाळून गावातील कुटुंबाकडेही लक्ष पुरवले आणि थोडय़ाच दिवसांत घरच्या मंडळींना मुंबईस बोलावून घेतले. निगुतीने आणि काटकसरीने साठवलेल्या पैशांत हरिभाऊंनी राहिलेल्या बहिणींची लग्ने करून दिली आणि आईचा यथायोग्य सांभाळ केला.
माहेरी विपन्नावस्थेचे चटके सोसल्यावर सासरी चांगले दिवस पाहावयास मिळतील या आशेने काशीबाईंनी हरिश्चंद्र कृष्णा चव्हाण यांचे स्थळ स्वीकारले. केशकर्तनालयात काम करणाऱया हरिश्चंद्र यांच्याशी विवाह करून सासरी आल्यावर पहिल्या काही दिवसात त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. पती सुस्वभावी असले तरी सततच्या आजारपणामुळे चिडचिडे झाले होते. अनेकदा क्रोध अनावर झाल्याने ते घर सोडून जात असत. त्यांचा त्रागा व चिडचिड यांची झळ काशीबाईंना बसू लागली. त्यात खाष्ट सासू सतत शेलक्या भाषेत टोमणे मारून व घरातील कामे करावयास लावून काशीबाईंना त्रास देती झाली. आगीतून उठून फुफाटय़ात पडल्यागत अवस्था झाल्याने काशीबाईंना संसारसुख कधी लाभले नाही. तरीही होतील ते व झेपतील तितके अविश्रांत परिश्रम मुखातून चकार शब्द न काढता करत राहणे हाच काशीबाईंचा दिनक्रम झाला. त्यातल्या त्यात पोटी जन्म घेतलेल्या गणपत या लेकराच्या ‘बाळलीला’ पाहणे हे काशीबाईंच्या विरंगुळ्याचे एकमेव साधन बनले. त्यांची ही दुरवस्था त्यांचे थोरले बंधू, हरिभाऊ यांना पाहवली नाही. त्यांनी काशीबाईंना त्यांचे सद्गुरू, श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्याकडे आणले. तेव्हा श्रीजांभेकर महाराजांचे वास्तव्य दादर-प्रभादेवी येथील फकिरशेटच्या बंगलीत होते.
श्रीजांभेकर महाराज काशीबाईंचे प्राक्तन जाणून होते. म्हणून पुढे जेव्हा कधी काशीबाई दर्शनाला येत असत तेव्हा श्रीमहाराज त्यांना पतिवियोगाविषयी सूचित करीत असत. अखेर काही दिवसांतच काशीबाईंचे पती आणि त्यानंतर पुत्र गणपतही निधन पावला. काशीबाईंचा हमाधुमीचा संसार पत्त्याच्या बंगल्यासारखा मोडून पडला. पती व पुत्रसौख्यास पारख्या झाल्याने आणि अवघ्या 43 व्या वर्षी संसाराचा खेळखंडोबा उडाल्याने एकाकी पडलेल्या काशीबाईंना आधार उरला होता तो केवळ सद्गुरू श्रीजांभेकर महाराज यांचाच. पती निधनानंतर काशीबाईंना सद्गुरूसेवेचे भाग्य अवघे तीन वर्षे म्हणजेच सन 1940 मध्ये श्रीजांभेकर महाराज समाधीस्थ होईतोवर लाभले.
श्रीमहाराजांचे उत्तराधिकारी श्रीनामदेव महाराज केळकर यांनी पहिली काही वर्षे काशीबाईंच्या सेवेची खडतर परीक्षा घेतली, मात्र पुढे त्यांचे निस्सीम सेवाकार्य पाहून त्यांनी गुरुभगिनीला स्वीकारले. त्यांच्या सान्निध्यात काशीबाईंना पारमार्थिक अधिकार प्राप्त झाला. अवलिया फकिरी वृत्तीच्या श्रीनामदेव महाराजांना काशीबाईंनी ‘माऊली’ होऊन सांभाळले. अखेर ‘माऊली’ काशीबाईंच्या मांडीवर डोके ठेवून श्रीनामदेव महाराजांनी देह सोडला तेव्हा त्यांच्या मुखात ‘काशीबाई, तुझे नाव होईल बरे!’ हे अंतिम शब्द होते. त्यांची ती दिव्य वाणी खरी ठरावी असेच कार्य काशीबाईंकडून घडले.
‘माऊली’ काशीबाई यांनी ‘उत्तराधिकारी’ या नात्याने श्रीजांभेकर महाराज समाधी मंदिराचा कारभार पाहिला. हा काळ विलक्षण कष्टप्रद होता. कारण तिथल्या काही स्थानिकांनी समाजकंटकांच्या सहाय्याने श्रीजांभेकर महाराजांच्या समाधीची वारंवार विटंबना केली होती. याच कारणाने पूर्वी श्रीनामदेव महाराजांचा अमानुष छळही झाला होता तेव्हा ‘माऊली’ खंबीर पहाडासारख्या उभ्या ठाकल्या व आपल्या सद्गुरूंच्या समाधीचे जिवावर उदार होऊन रक्षण केले. पुढे सत्याचा विजय झाला अन् श्रीमहाराजांच्या समाधीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. ‘माऊली’ काशीबाई यांनी संस्थेचे ध्येयधोरण व नेमनियम निश्चित केले. सद्गुरूंचे स्मृतिचरित्र लिहवून घेतले आणि त्यांना पुत्रासमान असलेल्या पूज्य आप्पासाहेब जगदाळे यांच्या हाती संस्थेचा कारभार सोपवून ‘माऊलीं’नी सन 1976 मध्ये आपले विहितकार्य संपवले.























































