
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्च रोजी अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळय़ाची आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी अयोध्येत सुरू आहे.
चलो अयोध्या ..
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2020
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील असे याआधीच जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासूनच शिवसैनिक आणि अयोध्यावासीयांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जातील, त्यांच्या जंगी स्वागताची तयारी सुरू असल्याची माहिती दिली.
जून 2019 मध्ये शिवसेनेच्या 18 खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अयोध्येला जाणार असल्याने देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये या दौऱयाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
दर्शन आणि महाआरती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी दुपारी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. यावेळी राज्यातून हजारो शिवसैनिकही अयोध्येला रवाना होणार असून या ऐतिहासिक सोहळय़ासाठी अयोध्यावासीही जोरदार मेहनत घेत आहेत.

























































