
दक्षिण कोकणची काशी म्हणून नावाजलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची सांगता देवस्वाऱ्यांच्या व भाविकांच्या पवित्र तीर्थस्रानाने रविवारी झाली. दर्श अमावास्येचा दुर्मिळ योग जुळून आल्याने समुद्र किनारी तीर्थस्रान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी दर्श अमावास्या असल्याने भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता. समुद्रकिनाऱ्यावर तिर्थस्रान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.तिर्थस्रान करून परत श्री कुणकेश्वरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. शनिवारी रात्री 12 वा.पासून समुद्रकिनाऱ्यावर धार्मिक विधी करून भाविकांनी तीर्थस्रानास प्रारंभ केला होता.पहाटे 5 वा.पासून ते 8 वा.पर्यंत देवस्वाऱ्यांनी समुद्रस्रान केले. या देवस्वाऱ्यांचा कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर देवस्वाऱ्यांनी आपल्या गावचा परतीचा प्रवास केला.
कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेली व्यापाऱ्यांच्या दुकानमध्ये दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. तसेच यात्रा सांगता होत असली तरी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.एस्टी महामंडळानेही भाविकांना चांगली प्रवाशी सेवा दिली. कुणकेश्वर यात्रेत बाजारपेठ तसेच समुद्र किनाऱ्यावर सर्वच बाजूनी विविध दुकाने थाटलेली दिसून येत होती मात्र सर्वात जास्त गर्दी ही कलिंगड बाजाराच्या ठिकाणी दिसून आली.त्याचप्रमाणे इळये येथील प्रसिद्ध असणारी कलिंगडाची याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
यात्रेच्या धार्मिकतेला कोणत्याही प्रकारची इजा पोहचु नये,यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवक काम करत होते.यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केल्याबद्दल भाविकांनी देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.देवस्थान ट्रस्ट,कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात सहकार्य करणाऱ्या शासकीय व सामजिक संस्था यांचे देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर,कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यावतीने आभार मानण्यात आले.



























































