
श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून शनिवारी संध्याकाळी एका मादी बिबट्याला वनविभागाने पकडलं आहे. शिवारात आढळलेल्या बछड्यांमुळे मादी बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते.
श्रीरामपूर तालुक्यातील चांडेवाडीतील शिवारात शनिवारी सायंकाळी दत्तु म्हसे यांच्या शेतात बिबट्यांचे तीन बछडे आढळले. त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिल्यामुळे वनविभागाने घटनास्थळी जाऊन पिंजरा लावला. तोपर्यंत दोन बछड्यांनी उसाच्या शेतात धूम ठोकली होती. वनसंरक्षकांनी एका बछड्याला पिंजऱ्यात ठेवले. रात्री बछड्यांच्या शोधात निघालेली मादी नऊ वाजेच्या सुमारास पिंजर्यात अडकली. त्यावेळी पिंजऱ्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच नागरिकांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली. त्यावेळी एक बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे वनविभागाला कळविण्यात आले. वनश्रेत्रपाल संतोष जाधव, वनसंरक्षक राहुल देवखिळे, विकास पवार यांनी टॅम्पोत पिंजरा ठेवून बारागाव नांदुर येथील रोपवाटिकेत पाठविला असल्याची माहिती देवखिळे यांनी सांगितले.
या खेरीज तालुक्यातील टिळकनगर येथील परिसरातील आठ वाड्या वस्त्यांवर गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी रात्री लजपतरायवाडी परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने पिंजरे लावले. परंतु बिबट्याची दहशत कायम असल्यामुळे ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. गेल्या 20 वर्षांपासून येथील शेती महामंडळाची जमीन पडीक असून जमिनीवर शेकडो बाभळीचे झाडे आहे. त्यामुळे तेथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
वाड्या वस्त्यावरील शेतकरी कामानिमित घराबाहेर पडल्यानंतर बिबट्या घरासमोरील लहान बालके, शेळ्या मेढ्यांवर हल्ला चढवतो. बिबट्यापासून शेळ्या, मेंढ्याना वाचविण्यासाठी शेतकरी रात्री पहारा देतात. परिसरात पिंजरा लावलेला असला तरी वनविभागाने परिसरातील बिबट्यांना जेरबंद करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच रविंद्र भालेराव, नसिमखातून जहागिरदार, बबन झिने, गणेश उमाप, राहुल खंदारे, विलास जाधव यांनी केली आहे.


























































