
गोव्यातील ड्रग्स डीलर आता ड्रग्सच्या झाडांची लागवड करू लागले आहेत.उत्तर गोव्यात अशी प्रकरणे उघडकिस येऊ लागली आहेत. रविवारी पेडणे पोलिसांनी मरडीवाडा-मोरजी येथे घातलेल्या धाडीत 33 किलोग्रॅम वजनाची कॅनबिसची झाडे जप्त करण्यात आली. 34 वर्षीय रशियन पर्यटक वारसिली रखनोव्ह याने भाड्यावर घेतलेल्या घराच्या गच्चीवर ही अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केली होती. या 33 किलो ग्रॅम वजनाच्या झाडांची किंमत 1 कोटी 65 लाख रुपये आहे. याप्रकरणी त्या पर्यटकाला अटक करण्यात आली आहे.
पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहिती नुसार मरडी मोरजी वाडा येथे घर क्रमांक 714/ए या घरात एक रशियन पर्यटक भाडेपट्टीवर घर घेऊन राहत होता. या घराच्या छतावर त्याने अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाल्यानंतर रविवारी सकाळी सापळा रचून या घरावर सकाळी 6.50 वाजता धाड घातली. त्यावेळी वारसिलीने गच्चीवर अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. हा सर्व माल जप्त करत रशियन नागरिकाला अटक केली.
सकाळी टाकण्यात आलेल्या या धाडीत पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक संजित कांदोळकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, कॉन्स्टेबल रुपेश कोरगावकर, अनंत भाईडकर, गुरुदास मांद्रेकर, देविदास मालकर , अनिशकुमार पोके, महेश नाईक व देऊ सरमळकर यांनी म्हापसा पोलिस स्थानकाचे अतिरिक्त ताबा संभाळणारे अधिक्षक एडविन कुलासो व उत्तर गोवा पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.


























































