
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी अद्यापपर्यंत उठवलेली नाही. यामुळे आठवडय़ाच्या सुरुवातीलाच कांद्याचे दर क्विंटलमागे चारशे रुपयांनी घसरले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी करत आज जिल्हाभरात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तर पिंपळगाव, लासलगाव, उमराणे, देवळा, मनमाड, येवला बाजार समितीबाहेर ठिय्या देण्यात आला. येवला बाजार समितीत सकाळी 96 वाहनांमधील कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी बुधवारी फक्त ट्विटरवरच निर्यात खुली केल्याचे जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात अध्यादेश काढलाच नसल्याने निर्यातबंदी कायम आहे. बुधवारच्या या ट्विटनंतर एकाच दिवसात साधारण तीनशे रुपयांनी कांद्याचा भाव वधारला होता, मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दरात घसरण सुरू झाली. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी आज दर क्विंटलमागे चारशे रुपयांनी घसरला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. बाजार समितीतील लिलाव संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लिलाव बंद पाडले. लासलगाव-पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू करीत केंद्र सरकारचा निषेध केला. विंचूर उपबाजार येथेही भाव घसरल्याने प्रहार संघटनेने नाशिक-संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला.
अंदरसूलला कांदा रस्त्यावर फेकला
मातीमोल भाव मिळत असल्याने येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मातीमोल दरामुळे कांदाविक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे त्वरित निर्यात खुली करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.





























































