
मुंबईच्या वाकोल्यातील 59 वर्षाचे संगीतकार बेनेट रिबेलो यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 1,387 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांनी रिबेलो यांना मारण्याचा दोनवेळा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आरोपपत्रात रिबेलो यांची 17 वर्षांची दत्तक मुलगी आणि तिच्या 16 वर्षांच्या प्रियकरासह त्यांना मदत करणाऱ्या 19 वर्षांच्या अलिमिया चाऊस यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
रिबेलो दत्तक मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्यांना मारण्यासाठी त्या दोघांनी दोनवेळा प्रयत्न केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच रिबेलो यांची हत्या केल्यानंतर त्यांची संपत्ती आपल्या नावावर होईल, असे वाटत असल्याने त्यांनी रिबेलो यांची हत्या केली. या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीनांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच या हत्येत त्यांना मदत करणाऱ्या चाऊसला महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी योगेश चव्हाण यांनी दिली असून त्यांनी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
या दोन अल्पवयीन आरोपींना 26 नोव्हेंबरला रिबेलो यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले आणि ते तीन सुटकेसमध्ये भरून बीकेसीतील मिठी नदीत फेकून दिले. माहिम दर्ग्याजवळ त्यातील एक सुटकेस 2 डिसेंबरला आढळल्यावर हे हत्याप्रकरण उघडकीस आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सापडलेल्या मृतदेहाच्या तुकडे जुळवल्यानंतर पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि तपास पथकाने रिबेलो यांची दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. तसेच 7 डिसेंबरला दोन सुटकेसही शोधण्यास यश आले. एक कुर्ला तर दुसरी सुटकेस शिवाजी पार्कजवळील समुद्रकिनाऱ्यावर आढळली. या प्रकरणाचा तपास करून अधिकाऱ्यांनी त्या दोघांचा मित्र चाऊस याला अटक केली. मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरून फेकण्यास चाऊसने त्यांनी मदत केली होती, असे पोलिसांनी सांगितले.




























































