
नगर शहरातील बोलेगाव फाटा ते गणेश चौक हा रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित ठेकेदारावर तसेच अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा पंधरा दिवसानंतर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान नगर शहराला पूर्णवेळ आयुक्त व जिल्ह्याला जिल्हा पोलीस अधीक्षक दिला पाहिजे. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे सुद्धा मागणी केली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अशोक बडे, मदन आढाव, अक्षय कातोरे यांसह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राठोड म्हणाले की, वेळोवेळी यासंदर्भात आम्ही पत्र देऊन सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. वास्तविक पाहता संबंधित ठेकेदारावर कारवाई टाकताय करायला पाहिजे होती व त्याला काळजी टाकायला पाहिजे होते. मात्र ते झाले नाही. ज्या वेळेला आम्ही आंदोलन केले, त्या वेळेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आता जर हे निकृष्ट दर्जाचे काम झाले असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही. म्हणून या सर्व प्रकरणाची तत्काळ चौकशी केली पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आढाव म्हणाले, हा रस्ता तयार करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ही जनतेची फसवणूक आहे. हा रस्ता चांगला व्हावा यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिले होते. आता या रस्त्यावरील आता हे गज उघडे पडले असल्याने व रस्त्यावर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाकण्यासाठी त्यावर पांघरुण घालण्यासाठी संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली फक्त सिमेंटचे पाणी ओतून उघडे पडलेले खड्डे व गज बुजविण्याचा प्रयत्न चालु केलेला आहे. रस्त्याच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शासनाची लूट करण्यात आलेली आहे. तरी या कामाची निष्पक्षपणे चौकशी करून ठेकेदार, इंजिनीयर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा महापालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नगरसेवक बडे म्हणाले, नगर शहरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी ठेकेदारामार्फत झाले होते. अत्यंत नित्कृष्ट स्वरुपाचे साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता लगेचच खराब झाला आहे. या रस्तासाठी शिवसेनेने मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी आमच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हे आंदोलन झाल्यानंतर संबंधित ठेकेदार याने तात्पुरती दुरुस्ती करुन कामचलाऊ पद्धतीने रस्त्याचे काम पुर्ण केले व रस्ता तयार केला. हा रस्ता अवघ्या चार महिन्यातच पूर्णपणे उखडला गेला आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यातील गज पूर्णपणे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे वाहनांचे अत्यंत नुकसान होत आहे.
























































