
>> मंगेश दराडे
गोंधळ, भारुड, कोळी नृत्य अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील लोककला सातासमुद्रापार पोहचवून गेली 15 वर्षे मराठी माणसाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम म्हणजे ‘मराठी बाणा’. येत्या रविवारी या कार्यक्रमाचा दोन हजारावा प्रयोग षण्मुखानंद हॉल येथे होत आहे. यानिमित्त निर्माते, लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…
मराठी बाणा कार्यक्रमाचे दोन हजार प्रयोग होतायत. याचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल?
– मराठी बाणा कार्यक्रमाचे यश म्हणजे मराठी संस्कृतीचा एकप्रकारे गौरव आहे. या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय मी मराठी रसिक प्रेक्षकांना देईल. मराठी बाणा हा प्रेक्षकांच्या नसानसांत, रोमारोमांत भिनला आहे. त्यांनी हा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर उचलून धरला. मराठी माणसाच्या संस्था टिकत नाहीत अशी ओरड असताना ‘चौरंग’ संस्थेच्या माध्यमातून मी ‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘आवाजकी दुनिया’, ‘मराठी बाणा’चे मिळून जवळपास नऊ हजार प्रयोग केले. आमचे कलाकार एकनिष्ठ आहेत त्यामुळे आम्ही एवढी मोठी मजल मारू शकलो.
मराठी बाणाची खरी संकल्पना कुठून आली?
– माझे बालपण लालबागच्या रंगारी बदक चाळीतले. तिथे सोळा चाळी होत्या. तिकडे सगळे सण उत्सव साजरे व्हायचे. ग्रंथवाचन, व्याख्यान, भारूड, रामलीला असे कार्यक्रमदेखील पार पडायचे. आमचे घर मध्यवर्ती ठिकाणी असल्याने लाऊड स्पीकरवर लागलेली सगळी गाणी आमच्या घरात ऐकू यायची. ही गाणी ऐकून ऐकून माझी तोंडपाठ झाली. एकप्रकारे माझ्यावर सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार या चाळीत घडले. मी सहावीत असताना चाळीतल्या कार्यक्रमात गायला लागलो. चाळीत मी जे आयुष्य जगलो, जे अनुभवले त्यातूनच मराठी बाणा खऱया अर्थाने रुजला. 1 नोव्हेंबर 2005 साली मराठी बाणा रंगभूमीवर आला.
2005 साली या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला होता. काळानुसार कार्यक्रमात काही बदल झाले का?
– लोककला ही कालामानानुसार बदलत राहते. पाणी जितके वाहत राहते तितके ते शुद्ध राहते. त्यामुळे आम्ही दररोज नव्याने विचार करतो. प्रत्येक कार्यक्रमात बुरगुंडाचा विषय बदलतो. आम्ही काळानुसार कार्यक्रमात सादरीकरणापासून तांत्रिक बाबतीत अनेक बदल केले आहेत. आमच्या कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे आमच्या 125 कलाकारांची टीम आजही टिकून आहे.
मराठी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक येत नाहीत अशी ओरड असताना तुम्ही चक्क 100 कलाकारांना घेऊन शिकागोत हाऊसफुल्ल प्रयोग केला होता. काय सांगाल त्याबद्दल?
– मी मूळचा आंबा व्यावसायिक. आम्ही जसा कोकणातला हापूस आंबा जगभरात पोहोचवला तसाच हा कार्यक्रमदेखील मी जगभरात घेऊन गेलो. 2011 साली बृहन्महाराष्ट्र मंडळाने शिकागो मॅकॉरमिक प्लेस येथील एरिकॉन थिएटर येथे ‘मराठी बाणा’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आम्ही 100 कलाकार तेथे घेऊन गेलो. महत्त्वाचे म्हणजे सगळा सेट आम्ही कंटेनरमधून जहाजाने तेथे पाठवला होता. ते पाहून आयोजक देखील आश्चर्यचकित झाले. पाच हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे थिएटर प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल गर्दीने तुडुंब भरले होते. यानिमित्ताने शिकागोत महाराष्ट्र अवतरला होता. मालेगावच्या इदगाह मैदानात तर एक लाख लोकांनी हा कार्यक्रम बघण्याचा विक्रम केला होता.
व्यापारी म्हणलं की नफा-तोटय़ाचे गणित आले. संपूर्ण लोककलेला वाहिलेला हा कार्यक्रम तुम्ही रंगभूमीवर आणला त्यावेळी तुम्ही याचा विचार केला होता का?
– व्यापारी हा नफा-तोटय़ाचा विचार करणारा असतो, पण नवनवीन कल्पना घेऊन येण्याचे धाडस व्यापाऱयातच असते. केवळ पैसा म्हणून हा कार्यक्रम करण्याची मला गरजच नव्हती. पण मराठी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आवड आणि जिद्द माझ्यात होती.
शिवसेनाप्रमुखांनीदेखील ‘मराठी बाणा’चे कौतुक केले होते. काय सांगाल त्या आठवणीबद्दल?
– मी अशोक हांडेचे सर्व कार्यक्रम पाहिले आहेत. मला मराठी बाणा हा कार्यक्रम देखील पाहायचा आणि माझ्या तमाम शिवसैनिकाना दाखवायचा आहे अशी इच्छा शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. बाळासाहेबांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि मला आशीर्वाददेखील दिले. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. दुसरी आठवण म्हणजे तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली, त्यात देवीच्या बाजूला जो सिंह आहे तो बरोबर वाटत नाही. मी तुला सिंहाचं डिझाईन बनवून देतो असे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला म्हणाले. त्यांनी दिलेल्या डिझाईनप्रमाणे नरेश शेरला यांनी एका रात्रीत तसाच मुखवटा बनवून दिला. तो मी लगेच उद्धवजींना नेऊन दाखवला. त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची प्रचिती आली.
मनोरंजनाची माध्यमे बदलली आहेत. मोबाईलवर वेब सीरीज बघण्याची सवय आजच्या पिढीला लागली आहे. त्याचा फटका रंगभूमीला बसलाय का?
– अजिबात नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रंगभूमीवर जो जिवंतपणा आहे त्याची सर मोबाईलच्या छोटय़ा स्क्रिनमध्ये नाही. उलट आमचा कार्यक्रम वारंवार पाहणारा खूप प्रेक्षक आहे. दीनानाथ नाटय़गृहाच्या खाली मासे विकणाऱया माणकुबाई या कोळणीने ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम तब्बल 227 वेळा पाहिला आहे. अशा प्रेक्षकांचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत.
























































