
शासनाने कापूस खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा कापूस शिस्तबद्धरित्या खरेदी केला जावा, यासाठी खरेदीपूर्व नोंदणी करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या असून बीड बाजार समितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचीच नोंदणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून या नोंदणीसाठी दोन हजार रूपये घेतले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
बीड बाजार समितीमध्ये स्वत: शेतकऱ्यांनी येऊन कापूस नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करून व्यापाऱ्यांसाठीच नोंदणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराकडे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यामध्ये कापूस खरदेसाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले आहे. बीड तालुक्यासाठी 3 ते 4 खरेदी केंद्र सुरू केले असून या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपला कापूस घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. आठ-आठ दिवस शेतकऱ्यांच्या कापसाचे माप होत नाही. ग्रेडर नसल्याने कापूस खरेदीसाठी मोठा विलंब होत आहे. कापूस खरेदी केंद्रावरील गर्दी कमी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्रास होवू नये, यासाठी शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये पूर्व नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बीड बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचीच गर्दी कापूस नोंदणीसाठी दिसत असून शेतकऱ्यांचे साताबारा गोळा करून नोंदणीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दोन हजार रूपये घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यातील काही शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारही केली आहे. व्यापाऱ्यांची नोंदणी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येवून सातबारा दाखवून नोंदणी बंधनकारक असताना इतर व्यापाऱ्यांची नोंदणी कशी केली जाते, असा सवालही केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.





























































