ठाण्याच्या जयश्रीची झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. प्रचंड मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱया गोष्टी साध्य करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जयश्री प्रवीण पांडव. या ठाण्यातील 35 वर्षीय गृहिणीने शरीरसौष्ठव, फिटनेस या प्रकारात धडाकेबाज कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. आता तिला जगातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑलिम्पिया या स्पर्धेत देशासाठी पदक जिंकायचे आहे. यासाठीच ती प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. पती प्रवीण पांडवचे तिला पाठबळ असून तो आपले स्वप्न तिच्यात बघत आहेत.

पुरस्कारही मिळाले

राष्ट्रीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱया जयश्रीला सरकारकडून ‘मेजर ध्यानचंद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘हिंद रत्न’ पुरस्कारानेही तिला गौरविण्यात आले.

घर सांभाळून खेळामध्ये प्रगती

प्रवीण व जयश्री यांना 13 वर्षांचा मुलगा आहे. घरी वडीलही असतात. क्रीडामध्ये प्रगती करताना जयश्री घरही व्यवस्थित सांभाळत आहे. पहाटे 5 वाजता तिचा दिवस सुरू होता. सुरुवातीला आपल्या ‘क्लाइंट’वर लक्ष दिल्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत स्वतः ती जिम करते. दुपारी 1 ते 4 या वेळेत ती कुटुंबाला वेळ देते. सायंकाळी पुन्हा जिम व कुटुंब असे तिचे चक्र सुरू असते.

अपघाताने आयुष्याला कलाटणी मिळाली

2011 साली जयश्रीच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. एका अपघातात तिचा जीव वाचला. त्यानंतर पती प्रवीणने जयश्रीसाठी पुढाकार घेत जिम सुरू करून दिली. यानंतर जयश्रीने मागे वळून बघितले नाही. स्वतः जिम करून फिटनेस राखताना तिने इतरांना याबाबतचे धडे देण्यास सुरुवात केली.