
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत पेण तालुक्यातील व्यापाऱ्यांनीही साथ दिली असून प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. पेण शहरात दररोज तालुक्यातील सुमारे तीनशे गावे व वस्ती, वाड्यावरील ग्रामस्थ पेणच्या बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदी येत असतात. परंतु रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांंनी दिलेल्या आदेशानुसार तसेच पेण नगर परिषद, पेण तहसील कार्यालय यांच्या विद्यमाने शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारपासून पेण शहरातील बाजारपेठ बंद झाली आहे.
किराणामालाची दुकाने, औषधांची दुकाने, दूध डेरी, पेट्रोल पंप, भाजी मार्केट इत्यादी अत्यावश्यक दुकाने व हॉस्पिटल्स मात्र सुरू आहेत. पेण शहरातील बाजारपेठ बंद असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांनी पेण शहरात येण्याचे टाळले असल्याने नेहमी गजबजलेले शहरातील रस्ते व एसटी स्टँड परिसरात मात्र शुकशुकाट दिसत होता.


























































