
कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन झाल्याने नागरिकांनी एकीकडे खाद्यपदार्थ, किराणा सामान आदी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सपाटा लावला असताना दुसरीकडे असाही एक निराधार वर्ग आहे ज्याला एकवेळच्या खाण्यासाठीही झगडावे लागत आहे. अशा गोर गरीब निराधार वर्गासाठी कल्याण येथे शिवसेनेने ‘मदतीचा हात देत अन्नाची पाकीटे पुरविण्याचा उपक्रम गेल्या चार दिवसांपासून सुरू केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या आठवड्यापासून शासनाने सर्वत्र आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लागू केली. या काळात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या लोकांनी अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी ठिकठिकाणच्या दुकानात मोठी गर्दी केलेली दिसत आहे. तर ज्यांची पोटं त्यांच्या हातावर चालतात अशा अनेक गोर, गरीब , कामगार, निराधार लोकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळचं अन्न तर दूरच साधे दोन घासही त्यांना मिळणे दुरापास्त झाले आहे. नेमकी हीच गरज ओळखून कल्याणमधील शिवसैनिकांनी या निराधार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, नगरसेवक सचिन बासरे यांच्या पुढाकाराने शिवसैनिक वंडार कारभारी, सशांक भोईर, जयेश लोखंडे, योगेश पष्टे, बाळा भोईर, अक्षय एखंडे मोहने आंबिवली परिसरातील शिवसेना पदाधिकारी उपशहरप्रमुख विजय काटकर, किशोर भाईर, परशुराम भोईर, यांच्यासह अनेक शिवसैनिक गेल्या चार दिवसांपासून कल्याणच्या विविध भागात फूड पॅकेट्सचे वाटप करीत आहेत. कल्याणातील रेतीबंदर, बस स्टँड, स्टेशन परिसर, रुक्मिणीबाई रुग्णालय मोहने, अटाळी, आंबिवली स्टेशन परिसर, आंबिवली गाव, आनंदनगर, शहाड रोड ठिकाणी दररोज साधारणपणे अडीच ते तीन हजार फूड पॅकेट वाटली जात असुन ३१मार्च पर्यंत अन्न पाकीटे वाटली जाणार आहेत. निराधार नागरिकांबरोबरच पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील इतर लोकांनाही फूड पॅकेट्स दिली जात आहेत. निराधार आणि बेघर लोकांसाठी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
























































