
बीड जिल्ह्यातील राज्यभर गेलेले ऊस तोड कामगार कोरोनाच्या धास्तीने गावाकडे परतत आहेत. शनिवारी 60 ऊस तोड कामगार बीड जिल्ह्यात दाखल झाले. त्यांना क्वारंटईन करण्यात आले आहे. त्यांच्या जेवण्याची अन आरोग्याची काळजी प्रशासन घेत आहे.
बीड जिल्ह्यातील तब्बल पाऊण लाख ऊसतोड कामगार अजूनही उसाच्या फडात आहेत. राज्यातील विविध कारखान्यांसह राज्याबाहेरही ते विखुरले गेले आहेत. कोरोनाच्या धास्तीने हे ऊस तोड कामगार कैचीत अडकले आहेत. जवळपास बहुतांश कामगार गावाकडे परत येण्याची घाई करत आहेत.
शनिवारी दिवसभरात 60 ऊस तोड कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात लाऊळ मधील 14, माली पारगाव येथील 17, संगम येथील 6, खोडास येथील 26 असे एकूण 60 असून परत आलेल्या या नागरिकांचे क्वॉरंटईन करण्यात आले आहे. माजलगाव, धारूर येथील क्वॉरंटईन होममध्ये त्यांची व्यवस्था केली गेली आहे. त्यांच्या नियमित तपासण्या होत असून 14 दिवस त्यांच्यावर नजर असणार आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर जीव धोक्यात घालून प्रवास न करता, आहे त्याच ठिकाणी राहावे, असे आवाहन बीडचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार. यांनी केले आहे.
























































