
शहरामध्ये संचारबंदी व जमावबंदीचे नियम मोडणाऱ्या तसेच जिल्हा प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्याविरुद्ध नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. 7 फळ विक्रेते, पाच ताडपत्री विक्रेते व दोन दुकानदार अशा एकुण 14 जणांना नगर पालिकेने जोरदार दणका देत हिंगोली शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली शहरामध्ये महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाकडून लागू झालेल्या जमाबंदी व संचारबंदीच्या आदेशाचे पालन होण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी भाजीपाला व फळ विक्रीची मुख्य बाजारपेठ बंद केली आहे. हिंगोली शहराची व्याप्ती लक्षात घेऊन 8 झोनमध्ये भाजीपाला व फळे विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र, काही फळ विक्रेते निश्चित करून दिलेली जागा सोडून शहरातील गांधी चौक भागात व्यवसाय करताना आढळून आले. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी नियमभंग करणाऱ्यांच्या तपासणीसाठी नगर परिषदेची पथके तयार केली आहेत. नगर पालिकेचे कर्मचारी पंजाब मस्के, डी. पी. शिंदे यांच्यासह पथकाने केलेल्या पाहणीत काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामध्ये निश्चित केलेली जागा सोडून व सोशल डिस्टन्सिंग न पाळता अब्दुल खयुम अब्दुल अजीस, शेख शफीक शेख बशीर, मो. रफिक मो. खाजा, मो. इद्रीस मो. मुसा, मो. नईम अब्दुल लतीफ , मो. हरून मो. लतीफ, करीम खयुम अब्दुल हमीद, सर्व राहणार बागवानपुरा हे सर्व फळविक्रेते आढळून आल्याचे नगर परिषदेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी करून देखील शेख शिष शेख रौफ रा. महादेववाडी, मो. जावेद अब्दुल कलिम रा. मस्तानशहानगर, शेख शौकत शेख माजिद रा. पेन्शनपुरा, शेख मुस्तफा अब्दुल करीम रा. मस्तानशहानगर, शेख शोएब शेख शकील रा. मस्तानशहानगर हे पाच जण ताडपत्री विक्री करताना तर संजय बन्सीलाल लदनिया रा. गांधीचौक, सुमित प्रकाश चौरसिया या दोघांनी त्यांची दुकाने सुरू ठेवल्याचे तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले आहे. या सर्व 14 जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील नागरिक व दुकानदारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडु नये. नियम मोडल्यास नाईलाजाने कार्यवाही करावी लागेल असा इशारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.



























































