Breaking news – चंद्रपूर जिल्ह्यातील इतर दुकानेही ठराविक वेळेत सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रशासनाने एक महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह इतर काही वस्तूंची दुकानेही ठराविक वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक सेवेच्या दुकानासाठी आठवड्यातील एक वार निश्चित करण्यात आला असून या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेतच ही दुकाने सुरू राहतील. ठरलेल्या दिवसाव्यतिरिक्त आणि वेळेची मर्यादा ओलांडली तर दुकानाविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर कलमांअंतर्गत कारवाई करण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाहीये. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे. यामुळे इतरही काही दुकाने सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रायोगिक तत्तावर घेण्यात आला असून जर नव्याने सुरू होणाऱ्या दुकानांमुळे अनावश्यक गर्दी झाली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. हा निर्णय फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. लॉकडाऊननंतर असा निर्णय घेणारा चंद्रपूर हा देशातील बहुधा पहिला जिल्हा असावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील रोजच्या वापरातील काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आली असून, प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे.

अशी असेल नवी व्यवस्था

  • चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार
  • इलेक्ट्रीक वस्तू आणि मोबाईलची दुकाने मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार
  • स्टेशनरी आणि इतर सामान्य वस्तंची दुकाने सोमवारी आणि बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार
  • हार्डवेअरची दुकाने रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार
  • कापडाची दुकाने आणि लाँड्री शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार