सिंधुदुर्गातही मास्क वापरणे बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाताना तीन पदरी मास्क, साधा कपडी मास्क किंवा रुमाल, किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयी गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या 18 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत 74 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 70 नमुन्यांचे आहवाल प्राप्त झाले आहेत. 4 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या 366 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 69 व्यक्ती आहेत. 28 दिवसांचे अलगीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती 96 आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज 2069 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

पोलिसांसाठी सॅनिटायझर टनेल कार्यरत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दल हे सदैव कार्यरत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीसांचे आरोग्य सुरक्षित रहावे, तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये याकरिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे निर्जुंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे. याचा गांभिर्याने विचार करून जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी निर्जंतुकीकरण सुविधा पुरवणारे मोबाईल वाहन तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे आणि तपासणी नाक्यावर सॅनिटायझेशन टनेल कार्यरत करण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाताना तीन पदरी मास्क, साधा कपडी मास्क किंवा रुमाल, किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयी आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत. वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा घरगुती त्यार करण्यात आलेल्या कापडाचे, रुमालाचे धुण्यायोग्य असावेत, त्याचा पुनर्वापर करताना स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करुन वापरावेत. वापरलेले मास्क इतरत्र टाकू नयेत, ते जाळून नष्ट करावेत. नागरिकांनी, शासकीय, निमसाशकीय, खाजगी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या वाहनातून, कार्यलय परिसरात प्रवास करताना, काम करताना, बैठकीच्या वेळी किंवा कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोणासही सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, धाप लागणे, थकवा येणे इ. कोरोना सदृष्य लक्षणे असल्यास त्यांनी सक्तीने वैद्यकीय तपासणी करून घेणे व शासकीय रुग्णालयाच्या सल्ल्याने कोरोना तपासणी करुन घेणे, तसेच लक्षणे दिसू लागल्यास त्याची माहिती आरोग्य यंत्रणेस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लक्षणे लपवल्यास व त्याची माहिती शासकीय यंत्रणास न दिल्यास संबंधितांवर साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कार्यवाही करण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणतेही कामकाज करत असताना कोरोना संसर्ग प्रतिबंधाविषयी उपाययोजना करणे व काळजी घ्यावी व सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आदेशही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्रचालकांनी डिजीपे च्या माध्यमातून पैसे काढणे, भरणा करणे, पैसे पाठविणे, तसेच खात्यातील रक्कम तपासणी या सुविधा नागरिकांनी द्यावयाच्या आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्रहकांना कमाल 10 हजार रुपये इतकी रक्कम फक्त आधार क्रमांकाद्वारे जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमन मार्फत काढता येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे कारण नाही. सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात ही सुविधा उपलब्ध असणार आहे.