
कोरोनापासून बचावासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी शासन आदेशान्वये मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करताना कुणी दिसून आले तर त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच महापालिका मुख्यालयात भेटीसाठी येणार्या अभ्यांगतांनाही चेहर्याला मास्क किंवा रूमाल बांधूनच येण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय मनपात प्रवेश करू दिला जाणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
शहरात मागील चार दिवसांपासून कोरोना व्हायरसचे बाधित रूग्ण आढळत आहेत. सिडको एन-4, आरेफ कॉलनीत दोन कोरोना बाधित निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे एकेक अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आजघडीला शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा 17 वर पोहोचला आहे. तसेच राज्यभरातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शासनाने शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्यांना बचावासाठी मास्क वापरण्याचे बंधनकारक केले आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त पाण्डेय यांनी यासंबंधीचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार महापालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचार्याला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात सॅनिटायझरचा वापरही आवश्यक केला आहे. विनामास्क कार्यालयात येणार्या कर्मचार्यांना मनपात प्रवेश दिला जाणार तर नाहीच शिवाय आदेशाचे पालन केले नाही म्हणून कठोर कारवाई देखील केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. मनपा मुख्यालयात अधिकारी, पदाधिकार्यांच्या भेटीसाठी येणार्या अभ्यांगतांनाही मास्क किंवा रूमाल चेहर्यावर बांधलेला असल्यानंतर प्रवेश देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना या आदेशान्वये देण्यात आल्या असल्याचे गुरूवारी महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.























































