श्रीरामपूर – लॉकडाऊन असताना मालगाडीतून गव्हाच्या पोत्यांवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन असताना भरदुपारी आऊटर सिग्नल वर उभी असलेल्या मालगाडीच्या एका बोगीचे दार तोडून गव्हाची पोती लुटण्यात आली. हा गंभीर प्रकार दौंड मनमाड मार्गावरील श्रीरामपुरात शुक़वारी घडला. बेलापूर रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपुरात या प्रकाराबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पंजाबहुन गुलबर्गाकडे (व्हाया मनमाड- दौंड मार्गे) गहु घेऊन जाणाऱ्या मालगाडीस बेलापूर रेल्वे स्टेशनचा सिग्नल मिळाला नाही. सिग्नल नसल्याने गहु घेऊन येणारी मालगाडी आऊटर सिग्नल वर थांबविण्यात आली. बजरंग चौक ते गोपीनाथ नगर भुयारी पुलावळ गाडी उभी असतांना मालगाडीच्या एका बोगीचे दार परीसरातील काही लोकांनी तोडले. बोगीत असलेल्या गव्हाची पोती लोकांनी लुटून नेली.

सायंकाळी उशिरा रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालगाडी गुलबर्गा याठिकाणी खाली झाल्यानंतर किती माल चोरीस गेला हे समजेल. कोरोनामुळे हा परीसर पोलिसांनी सील केला आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत, असे असे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एस. जाट यांनी सांगितले. या तपासासाठी रात्री पीएसआय एन. व्ही. जोशी, आर एस. जाट, डी. डी. गोरे, राम केकान, सचिन आव्हाड, देवेंद़ दहिफळे, शाम केवट, संदिप नवसरे भागातून तपास करत आहेत.