
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या 54 वर्षे वयाच्या कोरोनाबाधित रुग्णाचा आज पहाटे पाच वाजता मृत्यु झाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित बळींची संख्या दोन झाली आहे. या मृतावर कराड येथे पुरेपूर दक्षता घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. दि. 30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरू झाला. 5 एप्रिल रोजी त्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. मृतदेहावर कराड येथे आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती.































































