
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी वाहतूक बंद आहे. रायगड जिल्ह्यातही संचारबंदी असल्याने पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक भाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजी बाजारात आता बाहेरून येणाऱ्या भाजीपेक्षा स्थानिक भाजीला मागणी वाढत चालली असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.
रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका परिसर वगळता इतर तालुक्यात कोरोनाची लागण झालेली नाही. ही समाधानाची बाब असली तरी संपूर्ण जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू आहे. संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी वाहतूक तसेच नागरिकांनाही कामाव्यतिरिक्त फिरण्यास बंदी आहे. भाजी ही अत्यावश्यक सेवेत असल्याने भाजी बाजार सुरू आहे. मात्र, पुणे आणि इतर ठिकाणाहून भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिकणाऱ्या भाज्यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी पालेभाजी, गवार, टॉमेटे, मिरची, भेंडी, वांगी, वाल, कोबी, फ्लॉवर, तोंडली, दुधी, शिराळा यासारखी गावठी भाजी पिकवत आहे. ही पिकवलेली भाजी स्थानिक भाजी बाजारात जाऊन विकत आहे. कोरोनामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणारी भाजीची आवक कमी झाल्याने नागरिकांचा स्थानिक शेतकऱ्यांकडील गावठी भाजी घेण्याकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीला मागणी वाढली असून त्याच्याही गाठीला आता पैसा साठू लागला आहे. कोरोनामुळे सध्या देशभरात सर्व व्यवसाय ठप्प झाले असून फक्त शेतकरी राजा शेतात राबून कठीण परिस्थितीत नागरिकांना भाजीपाला पुरवत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी पिकाला मागणी असल्याने सुखावला आहे.

























































