
तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ‘रबर क्लार्क’ कंपनीला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली असुन या आगीत कच्चा माल, पक्का माल व कंपनी इमारत असे जळून खाक झाले आहे. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
खुपरी ग्रामपंचायत हद्दीत’ रबर क्लार्क’ ही कंपनी असुन रबरसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती केली जाते. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. त्यानंतर आग विझवण्यासाठी पालघर, भिवंडी, वसई, तारापुर येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. या अग्निशमन बंबाच्या गाड्या घटना स्थळी पोहचेपर्यंत कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. रबरसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला प्रथम आग लागून ही घटना घडली असावी तसेच नुकसानीचा अंदाज बांधता येणार नसल्याची माहिती कंपनीचे मालक पंकज गेठाणी यांनी सांगितले.
































































