देवरुखमध्ये माकडाचा पाठलाग करताना विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या आंबव येथे माकडाचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विजेच्या तारेला चिकटून मृत्यू झाला आहे. वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. संगमेश्वर येथे महामार्गावर दोन दिवसांपूर्वी रात्री एका इमारतीजवळ बिबट्या दिसला होता. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. शिकार मिळवण्यासाठी बऱ्याचदा बिबटे मानवी वस्तीमध्ये येतात.

घराजवळील कुत्री- मांजरे यांना पकडण्यासाठी बिबटे घरात शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मानवी वस्तीच्या जवळपास असणाऱ्या वानर आणि माकडांना बिबट्या भक्ष्य करतात. त्यामुळे बिबटे आल्यावर वानर मोठ्या आवाजात ओरडून एकमेकांना सावध करतात. मात्र, देवरुख नजिकच्या आंबव येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. माकडाला भक्ष्य बनवण्यासाठी बिबट्या त्याचा पाठलाग करत होता. मात्र, माकडाने बचावासाठी उंच असणाऱ्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर उडी मारली. यात माकडाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. माकडाने ट्रान्सफॉर्मरवर उडी घेतल्याचे पाहून त्याला खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्यालाही विजेच्या तारेचा धक्का बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि माकड आणि बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.