
देशभरातील लॉकडाऊनला आता 21 दिवस पूर्ण होत आहेत. या काळात वाहने आणि कंपन्या बंद असल्याने प्रदूषण कमी झाले आहे. तसेच या लॉकडाऊनचा आणि ठप्प झालेल्या कामकाजाचा पक्षीजीवनावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रामार्फत एक जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण करणार्या 10 ०तालुक्यांमधील एकूण 16 पक्षीअभ्यासकांनी मते नोंदवले. त्यांनी केलेल्या निरीक्षण, नोंदींवरून काही निष्कर्ष काढण्यात आले.
मानव वसाहतींजवळ राहणार्या चिमणी, कावळा, बुलबुल, राखी वटवट्या, शिंजीर, तांबट, भांगपाडीमैना, साळुंकी, कोकीळ, चिरक या पक्षांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली आहे. ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असून काही शहरी भागांमध्येही चिमण्या अजिबात दिसत नव्हत्या तिथे थोड्याफार प्रमाणात चिमण्या दिसू लागल्या आहेत. गावकावळ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच जंगली कावळेही दिसू लागले आहेत. हिवाळ्यात युरोपमधुन हिंदुस्थानात येणार्या व उन्हाळ्याच्या सुरूवातीला परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार्या रोझी स्टारलिंग अर्थात पळसमैना या पक्षांनीही हिंदुस्थानात मुक्काम वाढवला आहे. तर मनुष्यवस्तीजवळ सतत निवास करणार्या पारवा पक्षांच्या संख्येत घट झालेली दिसून आली. पक्षांच्या मनुष्यवस्तींजवळ वाढलेल्या पक्ष्यांच्या संख्येमुळे शहरी भागात पुन्हा एकदा दिवसाची सुरूवात पक्षांच्या किलबीलाटाने होत आहे. हळद्या, निळा कस्तुर, कृष्णथिरथीरा, निखार, निलीमा हे क्वचितच आढळणारे पक्षी आता अंगणात अधुनमधुन हजेरी लावत आहेत.
या लॉकडाऊन पक्षी सर्वेक्षणात जिल्ह्याभरातून समुहप्रमुख जयराम सातपुते यांच्यासह प्रो. डॉ. सुमन पवार, प्रो.डॉ.अतुल चौरपगार, संदिप राठोड,सचिन चव्हाण,प्रतिम ढगे, डॉ.नरेंद्र पायघन, मिलींद जामदार, शिवकुमार वाघुंबरे, स्नेहा ढाकणे, सुनिल वाघुंबरे, आशा कसबे, अनमोल होन, शशी त्रिभुवन, राजेंद्र बोकंद, वेदांत देवांग आदी पक्षीअभ्यासक सहभागी झाले होते.
























































