
कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वेरावळ, सौराष्ट्र व मंगरूळ या ठिकाणी अडकून पडलेल्या पालघर जिल्ह्यातील हजारो मच्छिमार आणि खलाशांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने अखेर बोटीवर अडकून पडलेल्या गावकरी मच्छिमारांना पालघरमध्ये आणण्यास सुरुवात झाली आहे.
गुजरातच्या समुद्रात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या खलाशी आणि मच्छिमारांना गावात परत आणण्याची मागणी सातत्याने त्यांचे नातेवाईक करत होते. शिवसेना खासदार राजेंद्र गावित खलाशांना परत आणण्यासाठी पाठपुरावा करत होते. पालघर जिल्हा प्रशासनाने दखल घेत अखेर त्यांना झाई येथे आणण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिली बोट झाई येथे पोहोचली आहे. त्यामध्ये 90 खलाशी असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यांना शासकीय आश्रमशाळा झाई याठिकाणी पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, सर्व पक्षाचे प्रतिनिधि आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खलाशांना उतरून घेत असताना सोशल डिस्टेंसिंग राखण्यात आले होते.
संचारबंदीमुळे राज्याच्या सीमा बंद असल्याने पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र व मंगरूळ या ठिकाणी बोटीतच अडकून पडले आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना पालघरमध्ये आणून पुढील काही दिवस क्वारंटाईन केले जाईल. यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही तसेच कुटुंबीयांची देखील काळजी दूर होईल, असे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.


























































