
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानंतर बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या भागात काही प्रमाणात सूट दिली आहे. शेतीची कामे, शेती उद्योग, ग्रामीण भागातील कारखाने तसेच इलेक्ट्रेशियन, प्लंबर, मोटार मेकॅनिक, कारपेंटर आदी सेवा क्षेत्र या भागात सुरू होतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंग नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. दरम्यान, ज्या भागात कोरोनाचा संसर्ग कायम आहे अशा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ही सूट मिळणार नाही. तसेच विमान, रेल्वे, बस ही सर्व वाहतूक सेवा, सर्व धार्मिक स्थळे, मॉल्स, थिएटर्स, गर्दीची सर्व ठिकाणे 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. घराबाहेर पडताना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला 21 दिवसांचा 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन जाहीर केला होता. काल या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आणखी कठोर राहील. सर्व राज्यांचे, जिह्यांचे निरीक्षण करून 20 एप्रिलनंतर केवळ हॉटस्पॉट नसलेल्या भागातच सूट दिली जाणार आहे.
परिस्थितीनुसार नियम आणखी कठोर करण्याचे अधिकार राज्यांना
‘कोरोना’चा प्रार्दूभाव आणि हॉटस्पॉट असलेल्या जिल्हा, विभाग आणि परिसरात सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. या जिह्यात, विभागात आणखी कठोर नियम लागू करण्याचे अधिकार राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना आणि स्थानिक प्रशासनाला आहेत. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन नियम कठोर करता येतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
3 मेपर्यंत काय बंद राहणार
देशातील सर्व सार्वजनिक वाहतूक, बस, रेल्वे, विमानसेवा बंद राहणार.
सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा सीलच ठेवणार.
दारू, गुटखा, तंबाखू विक्री आणि उत्पादने बंद, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणार.
सर्व धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, थिएटर, गार्डन, प्राणीसंग्रहालय, सभा, सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक सभा, समारंभ, क्रीडा स्पर्धा बंद राहणार.
लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार
मेडिकल, किराणा दुकाने, औषध निर्माण कंपन्या, किराणा आणि औषधांच्या मालाची वाहतूक.
एलपीजी गॅस सिलेंडर एजन्सी, पेट्रोल पंप, त्याची मालवाहतूक सुरू राहणार.
अत्यावश्यक सेवेतील पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया यांची वाहतूक सुरू राहणार. वृत्तपत्रे सुरू राहणार.
शेती कामे, शेती उद्योग, दूध, दूधजन्य पदार्थ उत्पादन–विक्री.
बँका, पोस्ट ऑफिस आणि अत्यावश्यक सुविधा.
20 एप्रिलपासून कोणाला सूट मिळणार?
कोरोनाचा हॉटस्पॉट नसलेल्या भागातच 20 एप्रिलपासून काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. जिथे प्रार्दूभाव कायम आहे तेथे ही सूट मिळणार नाही.
शेतीची कामे, पेरणी शेतकऱयांना करता येणार. शेती उद्योग सुरू राहणार. शेतातील माल मंडईपर्यंत घेऊन जाण्यास परवानगी.
ग्रामीण भागातील कंपन्या, एसईजेड क्षेत्रातील उद्योग, उत्पादन कंपन्या, माल निर्यात करणाऱया कंपन्या सुरू राहणार. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीस परवानग़ी मात्र दोन ड्रायव्हर आणि एकच हेल्पर आवश्यक.
पोल्ट्री, मटण-चिकन, मासे दुकाने उघडी राहणार.
सोशल डिस्ट्नि्संगचे नियम पाळून मनरेगा, रस्ता दुरुस्तीची कामे.
मोटार मेकॅनिक, प्लंबर, इलेक्टेशियन, कारपेंटरचे काम.
ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या गाडय़ा, कुरिअर सेवा सुरू राहणार.
आयटी आणि आयटी सर्व्हिस देणारे आस्थापना सुरू. मात्र, केवळ 50 टक्के कर्मचाऱयांची उपस्थिती. सोशल डिस्टन्सिंग आवश्यक.


























































