
लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आल्यानंतर आता नगर परिसरातील गरीब कुटुंबांकडून जेवण, किराणाच्या माल उपलब्ध करून देण्याची मागणी वाढत चालली आहे. मनपाच्या मदत केंद्रात आलेल्या मागणीनुसार नागरिकांना जेवण व किराणा किट वाटप सुरू असून, कल्याण रोडवरील कम्युनिटी किचनच्या माध्यमातून साडेसहाशे नागरिकांना जेवण उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली. दरम्यान, सावेडी व बोल्हेगाव परिसरातील नागरिकांसाठी त्या परिसरात कम्युनिटी किचन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून महापालिका अधिकारी व कर्मचार्यांनी शहरातील दानशूर व्यक्तींकडून मदत संकलित करून गरजू नागरिकांना किराणा मालाच्या किट उपलब्ध करुन देण्यास सुरूवात केली आहे. शहरातील सुमारे 250 कुटुंबियांना आतापर्यंत अशा किट उपलब्ध करून दिल्या आहेत. कल्याण रोड परिसरातील नागरिकांकडून मागणी वाढत असल्याने या भागात मनपाने कम्युनिटी किचन सुरू करून नागरिकांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी सुमारे 650 नागरिकांना जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शहरातील इतर भागातूनही मागणी वाढत असून, सावेडी व नागापूर, बोल्हेगाव येथील नागरिकांसाठी त्या भागात कम्युनिटी किचनचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपायुक्त पवार यांनी सांगितले.
दरम्यान, सिध्दार्थनगर परिसरातील अनेक नागरिकांनी ‘अन्नछत्र’चा उपक्रम राबवून जेवणाची सुविधा देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. या परिसरात हातावर पोट भरणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे त्यांच्या समोर मोठे संकट निर्माण झाले असल्याने मनपाने त्यांच्यासाठी सुविधा द्यावी, अशी मागणी सामाजिक समता विचारधारा फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे.


























































