
कोल्हापूरमध्ये गुरुवारी रात्री 9 ते 10.30 सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठमोठे वृक्ष वीजवाहिन्यांवर उन्मळून पडल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला याचा तडाखा बसला आहे. महावितरणचे 454 वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. तर हजारो खांबांवरील तारा तुटल्या आहेत. अशा परिरिस्थितीतही वीज कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभरात शहर व गावठाणचा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत केला आहे.
महावितरणच्या मागील संकटाची मालिका कमी होत नाही. पाच-सहा महिन्यांपूर्वी महापूर आणि आता अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. त्यात अवकाळीने भर घातली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा,शिये,भुये,वडगणे या भागात जुने व मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून वीजवाहिन्यांवर पडले. एमआयडीसी भागातील पत्र्यांचे शेड तारांवर अडकले. सर्वात मजबूत समजले जाणारे ‘रेल पोल’ सुध्दा अक्षरश: मोडून पडले. एमआयडीसीतील बहुतांश उद्योग लॉकडाऊनमुळे बंद असले तरी वृत्तपत्र व आदी औद्योगिक ग्राहक ज्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे, त्यांचा वीजपुरवठा मार्केटयार्ड उपविभागाने रात्रीतून सुरु केला. कसबा बावडा व नागाळापार्क भागाला शक्य असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्यात आला. गडहिंग्लज शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी युध्दपातळीवर पूर्ववत करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या अवकाळी पावसात उच्चदाबाचे 170 व लघुदाबाचे 284 असे 454 वीजखांब पडले होते. तर 11 रोहित्रसुध्दा जमीनदोस्त झाले आहेत. विजेच्या कडकडामुळे शेकडो खांबावरील ‘इन्सुलेटर’ फुटून तारा खांबावर निखळून पडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे कंत्राटदारांना कामगार मिळत नसल्याने कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.



























































