मुंबईचे ट्रकवाले अडकले गुजरातेत, तीन आठवडय़ांपासून ट्रकचालक रस्त्यावरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

‘‘लॉकडाऊन झाले, आमच्या गाडय़ा आहे तिथेच थांबल्या… तीन आठवडय़ांपासून आम्ही गुजरातच्या नवसारी येथे रस्त्यावरच मुक्काम करून आहोत. ढाबे बंद आहेत, हॉटेल सुरू नाहीत. एका दुकानातून काही सामान मिळाले. रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करतो, जेवण करतो अन् गाडीत येऊन झोपतो… पण आता घराची ओढ लागली आहे… डोळय़ासमोर कच्चेबच्चे दिसतात…’’  डोळय़ात पाणी आणून विजयकुमार राम सांगत होता.

मुंबईचे व्यापारी गुजरातेतून प्लायवूड आणतात. लॉकडाऊनच्या अगोदर बऱ्याच व्यापाऱ्यांनी प्लायवूड आणण्यासाठी मालवाहू ट्रक गुजरातेत पाठवले होते. 21 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले अन् हे ट्रकचालक नवसारीच्या रस्त्यावरच थांबले. जिल्हय़ांच्या सीमा सील झाल्यामुळे पुढे निघता येणार नाही असे सांगण्यात आले. सुरुवातीला दोन दिवस काही हॉटेलातून कसेबसे जेवण मिळाले. मात्र नंतर ढाबे, हॉटेल्स सगळेच बंद झाले. त्यामुळे खाण्याचेच वांधे झाले. किराणा दुकानातून गरजेच्या जिनसा घेतल्या आणि रस्त्यावरच चूल मांडली. निदान दोन वेळच्या जेवणाची तरी सोय झाली, असे ट्रकचालक विजयकुमार राम याने सांगितले. सगळय़ांच्या हितासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, त्यात मला एकटय़ाला कशी सूट मिळेल, असे तो म्हणाला.

घरची आठवण येते…

विजयकुमार राम हे मूळचे बिहारचे. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, चार मुले राहतात. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांना माझी काळजी वाटते. फोनवर विचारतात. मी त्यांना सांगितले आहे, माझी काळजी करू नका, लॉकडाऊनचे पालन करा. स्वच्छ हात धुवा, मास्क घाला, असे मी मुलांना कटाक्षाने सांगतो. एवढेच नाही, तर मी स्वतः चांगल्या प्रतीचा साबण वापरतो, असेही तो म्हणाला. सुरुवातीला काही वाटले नाही, पण आता घराची ओढ लागली आहे… असे त्याने पाणावल्या डोळय़ांनी सांगितले.