
नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या लाळेच्या नमुन्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघे काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची मुले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 31 झाली आहे. यासह मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधीत व्यक्तीचा पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
दरम्यान, आज सोमवारी आणखी 5 जणांना 14 दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एका 76 वर्षीय व्यक्तीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना संस्थात्मक आणि रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 18 झाली आहे, तर सध्या बूथ हॉस्पीटलमध्ये 11 जण उपचार घेत आहेत.
जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलं कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 31 झाली आहे.
जामखेड हॉटस्पॉट केंद्र जाहीर
जामखेड शहर हे हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात 2 किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी जामखेड शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक 1 मे, 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 01 मे, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे.
























































