2030 साली मुंबई 2 कोटी 80 लाखांची होणार! जगातील सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्र संघाच्या ताज्या अंदाजानुसार 2030 मध्ये मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 80 लाख होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत जगात सहावे असलेले मुंबई शहर चौथ्या क्रमांकावर पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई शहराची लोकसंख्या 1950 साली केवळ 30 लाख 88 हजार 811 इतकी होती. परंतु गेल्या 20 वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या नागरीकरणाबाबतच्या 2020 च्या अंदाजानुसार मुंबईची लोकसंख्या अंदाजे 2 कोटी चार लाख 11 हजार 274 इतकी असून मुंबईच्या लोकसंख्येचा वाढीचा वार्षिक वेग 1.11 टक्के इतका राहीला आहे. मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱयांची संख्या वाढतच असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठया असलेल्या धारावी झोपडपट्टीची चर्चा केली जाते आहे. देशाची लोकसंख्या या घडीला 130 कोटी इतकी असून दर चौरस किलोमीटर मागे देशात 410 लोक राहतात. तर मुंबई शहरातील लोकसंख्येची घनता पाहता दर चौरस किलोमीटर मागे मुंबईत 21 हजार लोक दाटीवाटीने राहत आहेत.

चीनचे शांघाय नंबर वन …

दोन कोटी 41 लाख लोकसंख्या असलेले चीनचे शांघाय शहर जगातील पहिल्या क्रमांकावरील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. त्यानंतर जगातील मोठय़ा महानगरांमध्ये चीनचे बिजींग, कराची, इस्तंबूल आणि बांगलादेशातील ढाका शहराचा क्रमांक लागत आहे.

दहा दशकात दहिसर व गोवंडीची लोकसंख्या 20 टक्क्यांनी वाढली

– संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई शहरातील शहरीकरणाचा अंदाज नुकताच जाहीर केला असून त्यात 2015 पासून पाच वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत 10 लाख 95 हजारांची म्हणजे सुमारे अकरा लाखांची भर पडल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा दशकात मुंबई शहरातील पश्चिम उपनगरातील मालाड-दहिसर विभागातील तसेच पूर्व उपनगरातील चेंबूर – गोवंडी पट्टय़ातील लोकसंख्या 17 ते 20 टक्के वाढली असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या शहरीकरणाच्या अंदाज अहवालात म्हटले आहे.

देशात केवळ 63 हजार पारसी उरले!

आपल्या देशाची लोकसंख्या 1.3 अब्ज असून त्यात केवळ 63 हजार पारसी उरले आहेत. उच्च शिक्षित आणि उद्योजग असलेल्या पारसी समुहाची सध्या तरी मुंबईच राजधानी आहे.