
रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 ने कमी झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या घटून 39 झाली आहे. या कोरोनाग्रस्तांना बाहेरून आलेल्यांमुळे लागण झाली होती. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांच्या उत्तम कामगिरीमुळे 16 जण हे कोरोनाच्या विळख्यातून सुटले आहेत. या सगळ्या कोरोनाग्रस्तांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात एकूण 519 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा मुंबई, ठाणे यासारख्या शहरातून आलेल्या लोकांमुळे तसेच इतर राज्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने वाढला होता. जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतर हे लागण होण्याचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं होतं. रायगड जिल्ह्यामध्ये जे रुग्ण सापडले आहेत त्यांपैकी पनवेल महानगरपालिका हद्दीत 25, पनवेल ग्रामीणमध्ये 3, उरणमध्ये 4, श्रीवर्धनमध्ये 5, नेरळ आणि पोलादपूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पनवेल आणि पोलादपूर येथे मिळून 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


























































