
धाराशीवमध्ये सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत शहरातील कोणत्याही ठिकाणाहून फोन आला की धाराशीव जिल्हयातील कळंब येथील देवडा बंधु जेवणाचा डब्बा घेऊन पोहचतात. या दोन भावांनी संचारबंदीच्या काळात भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबवला आहे. या महिन्याभराच्या काळात त्यांनी 10 हजारपेक्षा जास्त लोकांपर्यंत कुठलाही गाजावाजा न करता जेवणाचे पाकिट पोहचवले आहे.
कोरोना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. पालावर राहणारे व दररोज भटकंती करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. कळंब शहरात अनेक पालावरची घरे आहेत. त्यांना या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शहरातील देवडा फाऊंडेशनचे संजय देवडा आणि अभय देवडा शहरातील गोरगरीबांना जेवणाचे पाकीट देण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे दोन भाऊ सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत फक्त लोकांना जेवणाचे पाकीट देण्याचे काम करत आहेत. दररोज 200 ते 250 लोकांना जेवण पोहचवण्यात येत आहे.
भुकेलेल्यांची मदतीसाठी देवडा बंधू तत्पर
कळंब शहरातून गावाकडे जाणारे अनेक लोक आहेत. अनेकजण उपाशीपोटी चालत प्रवास करत आहेत. अशा लोकांना शोधून त्यांच्या पोटात चार घास कसे जातील ,हा विचार करुन हे दोन भाऊ दिवसभर शहरात फिरुन अन्नदान करत असतात. शहरातून कुठल्याही ठिकाणावरून फोन आला की देवडा फाऊंडेशनकडून त्या ठिकाणी जेवणाचे पाकिट पोहचवले जाते. भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचे त्यांचे विशेष आहे. 23 मार्चपासून ते आतापर्यंत देवडा फाऊंडेशन भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचे काम करत आहे. या एक महिन्याच्या कालावधीत 10 हजारपेक्षा जास्त लोकांपर्यंत त्यांनी जेवण पोहचवले आहे.
देवडा फाऊंडेशनकडून मजूरांना नाश्ता
शहरात जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये अडकलेल्या मजुरांचे रिलीफ सेंटर आहे. तेथे 129 जणांना ठेवण्यात आले आहे. येथील लोकांना सकाळचा नाश्ता देवडा फाऊंडेशनतर्फे देण्यात येत आहे.
























































