
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने घातलेले निर्बंध आपले जीव वाचवण्यासाठी आहेत हे नागरिकांच्या टाळक्यात घुसत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. हम नही सुधरेंगे हे अधोरेखित करत हिंगोली शहरासह जिल्ह्यात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिग न पाळता गर्दी सुरूच ठेवली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एक जण कोरोना बाधित आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडत असल्याची बतावणी करून बाजारात फिरल्यास दुचाकीस्वारांना दंड, मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे यासाठी ग्राहक व दुकानदारानाही दंड करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. नगर परिषदेने त्यानुसार हिंगोली शहरामधील व जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे 100 च्या वर लोकांनी दंड केला आहे. हिंगोली शहर व जिल्ह्यात एक दिवस आड किराणामाल व भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू आहेत. दरम्यान आज 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता बाजार उघडताच हींगोली शहरामध्ये भाजीपाला व किराणासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. सोशल डिस्टन्सीग न पाळता दाटीवाटीने नागरिक खरेदी करत असल्याचे चित्र पहिल्या अर्ध्या तासातच दिसून आले. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत वेळ दिलेला असताना सकाळीच गर्दी झाली आहे. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. नगर पालिकेने हिंगोली शहरातील 18 रस्ते फक्त सुरू ठेवले असून पंचावन्न रस्त्यांना बॅरीकेटींग लाऊन बंद केले आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रयत्नशील असताना नागरिकांकडून मात्र हरताळ फासला जात आहे.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दणका
शुक्रवारी सकाळी हिंगोली शहरामध्ये मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने फिरणाऱ्या 23 जणांना नगर पालिका व पोलिसांच्या पथकाने शहर पोलीस ठाण्यामध्ये आणले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सय्यद, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांना नोटिसा देऊन सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.































































