Corona Effect- ब्रिटनमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी मशिदीने दिली जागा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अमेरिका, इटली, स्पेन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने फैलावत आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढल्याने मृतदेह ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या शहराबाहेर तात्पुरती दफनभूमी बनवण्यात आली आहे. तरीही शहरातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यसंस्काराशिवाय पडून आहेत. या दोन शहरांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी विशेष ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ब्रिटनमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एका मशिदीने आपली जागा वापरण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 18,700 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनभूमीतील जागेची अडचण जाणवत आहे. तसेच अनेक रुग्णालयातही मृतदेहांचा खच पडला आहे. दररोज मृतांची संख्या वाढत असल्याने शवागारातील जागाही मृतदेहासांठी कमी पडत आहे. ब्रिटनमधील अनेक शहरात अशीच स्थिती आहे. बर्मिंघम शहरात ही समस्या ओळखून एका मशिदीने आपली जागा मृतदेह ठेवण्यासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. मशिदीसाठी असलेली पार्किगची जागा आणि मशिदीच्या परिसरात मृतदेह ठेवण्यासाठी तात्पुरते शवागार उभारण्य़ात आले आहे. या ठिकाणी 150 मृतदेह ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना येणे शक्य होत नाही. कुटुंबियांची वाट बघण्यासाठी मृतदेह आठवडाभर शवागारात ठेवण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतर नाइलाजाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे प्रशासनाने सांगितले. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या समस्येवर मशिदीने पुढाकार घेत स्वतःची जागा वापरण्याची परवानगी दिल्याने शहराची मोठी समस्या सोडवली आहे.