युवासैनिकाच्या तत्परतेने वीस मिनिटात अग्निशमन बंब पोहोचल्याने या गावात भीषण दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली तालुक्यातील कोथळज येथे येथे आज दुपारी गावाच्या मध्यभागी मोठी आग लागली होती. त्यावेळी शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थांकडून जमेल तशी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. युवासेनेचे हिंगोली जिल्हा युवा अधिकारी व यवतमाळचे विस्तारक दिलीप घुगे यांनी हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना विनंती करून वीस मिनिटात कोथळज येथे अग्निशमन बंब पोहोंचवला आणि ही  आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

हिंगोली शहरापासून कोथळज गावाचे अंतर 8 कि.मी. आहे. कोथळज येथे आज 26 एप्रिल रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान गावाच्या मध्यभागी आगीची ठिणगी पडली. तापत्या ऊन्हामुळे की आग पसरत होती. त्यावेळी गावातील शिवसैनिक, युवसैनिक व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या शेतातील 12 विद्युत मोटारी सुरू करून पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.  ही घटना भ्रमणध्वनीवर समजताच युवासेनेचे हिंगोली जिल्हा युवा अधिकारी व यवतमाळ जिल्ह्याचे विस्तारक दिलीप घुगे यांनी हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना कोथळज येथे अग्निशमन बंब पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार हिंगोली  नगर परिषदेचा अग्निशमन बंब वीस मिनिटात कोथळज येथे दाखल झाला. तसेच आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांचे आभार व्यक्त केले. कोथळज येथील शिवसैनिक, युवासैनिक ग्रामस्थ व नगर परिषदेच्या अग्निशमन बंबामुळे ही आग विझल्यामुळे गावात मोठी भीषण दुर्घटना टळल्याचे दिलीप घुगे यांनी सांगितले. वेळीच अग्निशमन बंब पोहोंचला नसता तर आगीचा वणवा भडकण्याची भिती होती. मात्र, कोथळज गावावरील मोठे संकट टळल्याचे घुगे म्हणाले.