
हातकणंगले तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी 25 देशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण केले होते. त्यामध्ये ग्रामिणमध्ये 54 व शहरामध्ये 72 लोकांचे 28 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. तर इतर राज्यातून, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगिकरण करण्यात आले होते. या सर्वांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. या सर्वांमध्ये कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हातणंगले तालुका समितीचे तहसिलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी अरूण जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या उत्कृष्ट नियोजन व संयोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी हातकणंगले व्यवस्थापन समितीचे गटविकास अधिकारी अरूण जाधव यांनी दिलेल्या एकवीस एप्रिलच्या अहवालनुसार पचवीस देशातील ग्रामीण व शहरी भागात आलेल्या लोकांचे होम क्वारंटाईन 12 मार्चपासून केले. त्यांचा 28 दिवसांचा कालावधी संपला. ‘ग्रामीण भागात 54 व शहरी भागात 72 जणांचे अठ्ठावीस दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण होऊन ते निरोगी असल्याने कोरोना संसर्गाची भिती दूर झाली आहे. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन घरातच रहावे आणि प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे’, असे आवाहन तहसीलदार प्रदिप ऊबाळे यांनी केले.
























































