
राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती.
राजस्थान येथील कोटा येथे आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते.लाॅकडाऊनमुळे ते त्याठिकाणीच अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती केली होती.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 28, 2020
त्यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तत्काळ माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. या विनंतीमुळे महाराष्ट्र शासनाने राजस्थान सरकारसोबत संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. राजस्थान सरकारने या विद्यार्थ्यांना आपण सुखरुपपणे तुमच्या हवाली करू असे कळवले होते, त्यानुसार या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आले आणि हे सगळे विद्यार्थी आता रायगडकडे रवाना झाले आहेत.
राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांना राज्यात आपल्या मुळगावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. आज पहाटे कोटा येथून या सर्व ३२ विद्यार्थ्यांना घेवून बसेस निघाल्या आहेत. विद्यार्थ्यांकरीता उज्जैन व धुळे येथे फुड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 28, 2020
त्यांना पनवेल येथे आणल्यानंतर त्यांची कोवीड-१९ चाचणी करण्यात येणार असून किमान २८ दिवसांपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 28, 2020
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसीलदार विशाल दौंडकर यांनी पुढील समन्वयाची आवश्यक ती तयारी केली. 28 एप्रिलला या विद्यार्थ्यांना घेऊन राजस्थानवरून बसेस निघाल्या असून प्रवासात त्यांच्याकरिता उज्जैन व धुळे येथे फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधी सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पनवेल येथे आणल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 28 दिवसांपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.



























































