3 मे नंतर लॉकडाऊन संपणार की वाढणार? पंतप्रधान मोदींची मंत्रिमंडळाशी खलबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी दोन दिवसांनी अर्थात 3 मे रोजी संपणार आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचा संपणारा कालावधी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह अन्य काही मोठे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लॉकडाऊनबाबत अनेक खलबत झाली.

‘आज तक’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 3 मे नंतर सरकारची रणनीती आणि 4 मे पासून कोणत्या भागात सूट दिली जाऊ शकते यावर खलबत झाली. येत्या एक ते दोन दिवसात गृह मंत्रालयाकडून याबाबत नवीन दिशानिर्देश जारी होण्याची शक्यता आहे. कोणत्या भागात सूट दिली जाईल? कुठे अधिक कठोर निर्बंध लागू केले जातील? कोणत्या झोनमध्ये काय स्थिती असेल? याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

3 मे रोजी ‘लॉकडाऊन 2’ संपणार?
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याचा कालावधी 3 मे रोजी संपणार आहे. तसेच देशाचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 35 हजार पार गेला आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे आवाहन सरकारपुढे असणार आहे. याबाबत निर्णय घेण्याआधी मोदींनी बैठक घेतली आणि तत्पूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजाराच्या पार, मृतांचा आकडा 1,152 वर

तीन झोनमध्ये विभागणी
केंद्राने लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याआधी संपूर्ण देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशी विभागणी करण्यात आली आहे, तसेच यात थोडे बदलही करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने 130 जिल्हे रेड झोनमध्ये, 284 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये ठेवले आहेत. देशातील प्रमुख शहर रेड झोनमध्ये तासून ज्या भागात गेल्या 28 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही ते ग्रीन झोनमध्ये आहे. इथे थोडी सूट मिळण्याची शक्यता आहे.