
कोरोनाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आता पालिकेत कर्मचार्यांची शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून कर्मचार्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी 20 मार्चपासून केवळ 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत पालिकेचा कारभार सुरू होता.
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, केवळ 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत काम करताना पालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे आता सर्व कर्मचार्यांना कामावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उपलब्ध होणार्या कर्मचार्यांचा वापर कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्क शोधणे, क्वॉरंटाइन सेंटर मॅनेजमेंट, पालिका रुग्णालये-प्रयोगशाळांमध्ये सहाय्य अशा सुविधांसाठी करता येणार आहे. आवश्यकता असणार्या सुविधांसाठी उपलब्ध होणारे मनुष्यबळ संबंधित खातेप्रमुखाच्या ‘ना-हरकती’नंतर वापरता येणार आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार्या म्हणजेच पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई किंवा त्यापुढे राहत असतील त्यांना त्यांच्या हद्दीपासून जवळ असणार्या पालिका कार्यालयात किंवा पालिकेच्या सेवेच्या ठिकाणी आपली सेवा बजावावी लागणार आहे. दरम्यान, हे परिपत्रक शुक्रवारपासून लागू करण्यात आले असले तरी 1 मे रोजीची सुटी आणि शनिवार, रविवार येत असल्याने सोमवारपासूनच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल.
गैरहजर राहिल्यास कारवाई
नव्या परिपत्रकानुसार कर्मचार्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे कर्मचार्याला उपस्थित राहण्याबाबत कळवल्यानंतरही विना परवानगी अनुपस्थित राहतील त्यांची रजा ‘बिनपगारी’ म्हणून नोंदवण्यात येईल. गैरहजर राहणार्यांच सेवा खंडित करण्यात येणार नसली तरी ‘साथरोग कायदा 1897’नुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कर्मचारी गंभीर आजारी, किंवा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांना यातून सूट देण्यात येईल.
अशी होणार कार्यवाही
- ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस अशा स्वरूपाचे गंभीर आजार आहेत त्यांना 30 एप्रिलपासून पुढील एक महिना अनुपस्थित राहता येईल.
- लोकल बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहचणे आणि दैनंदिन जेवण-खाण्यासाठी 300 रुपयांचा भत्ता देण्यात येईल. हा भत्ता डॉक्टरांनाही मिळण्यात येणार असून तो त्यांच्या वेतनातून अदा करण्यात येईल. शिवाय सहायक अभियंता, संबंधित कर्मचार्यांनाही याचा लाभ मिळेल.
- दिव्यांग कर्मचार्यांची रोगप्रतिकारशक्ती सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत कमी असल्यामुळे आणि दळणवळणाबाबत ऐनवेळी अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनाही 15 मेपर्यंत कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
























































