दहावी व बारावी विद्यार्थ्यांना वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मेपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माध्यमिक शालांत ( दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी) परीक्षेसाठी 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणांसाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि कनिष्ट महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत दिली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 21 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने हे प्रस्ताव सादर करणे शक्य झालेले नाही. पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये म्हणून संबंधित शाळा, कनिष्ट महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात 13 मेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यास व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून 20 मेपर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशीसह सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे.एन.सी.सी., स्काऊट गाईडमधील विद्यार्थी व शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठीचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळांकडे 13 मेपर्यंत व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे 20 मेपर्यंत सादर करायचे आहेत.