
>> अजित कवटकर
रणरणत्या उन्हाच्या रखरखीतपणातही पानाफुलांना झाडावर बहरताना बघायला मिळणे फारच दुर्मिळ आणि म्हणूनच आश्चर्यकारक. औद्योगिक स्पर्धेच्या या प्रदुषित युगात अनैसर्गिक वाटणारी ही प्रक्रिया घडण्याचे निमित्त ठरले ‘कोरोना’ आणि त्यामुळे झालेले लाँकडाऊन. या महामारीमुळे मनुष्याची होत असलेली दुर्दैवी जीवितहानी सोडल्यास, हा प्रादुर्भाव निर्सगासाठी, प्राणिसृष्टीसाठी वरदान ठरला आहे. असे म्हणता येईल. या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या भीतीने माणसाचा वावर, संचार थांबला आणि निसर्ग मात्र बहरला.
सध्या हवा इतकी स्वच्छ, शुद्ध, पारदर्शक झाली आहे की ध्यानीमनीदेखील नसलेल्या दूरवरच्या डोंगर रांगा आता स्पष्ट दर्शनास पडत आहेत. या आश्चर्यावर विश्वास ठेवणे मुश्किल होत आहे. कारण आजतागायत असे कधीच बघायला मिळाले नव्हते. इतकं सगळं अकल्पित आहे. काही वन्यप्राणी आपल्या सुरक्षित व नैसर्गिक अधिवासाच्या सीमा ओलांडून निर्धास्तपणे शहरात फेरफटका मारत असल्याचे व्हिडियो व्हायरल होत आहेत. नामशेष गणल्या गेलेल्या प्रजाती अचानक प्रकट होणे, खोल समुद्रामधील दुर्मिळ जलचर किनार्यापर्यंत विहार करण्यासाठी निर्भयपणे येणे, शहरवासीयांना प्रभातसमयी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येणे, ओझोन थराची विरळता काही प्रमाणात भरून निघाल्याची बातमी ऐकायला मिळणे, कोरोनाची एक भीती सोडल्यास मनुष्यातील एरवीची दुखणी अचानक कमी होणे वगैरे बदल या लाँक डाऊन काळात जाणवत आहेत. या बदलांचा अर्थ काय?
पृथ्वीवर आपल्या व्यतिरीक्त असलेले इतर सर्वकाही हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे या अविर्भावात मनुष्य आजवर वागत आला आहे. सगळ्याचे अमर्याद शोषण करत त्यांना संपविण्याचा प्रयत्न मानवाने केला. वास्तविक, परस्परावलंबी सहजीवनातच सुखी, निरोगी जीवनाची शाश्वती व आधार आहे, याचा माणसाला विसर पडलेला होता. जीवनउर्जा देणार्या स्त्रोतांना उद्ध्वस्त करणारी त्याची कृती अनवधानाने का होईना, पण निरंतर घडत आहे. या पृथ्वीवर जितका आपला अधिकार आहे तितकाच तो इतर सजीवांचादेखील आहे आंणि त्यांनाही जगण्याचा, भरभराटीचा तितकाच हक्क मिळणे रास्त आहे. त्याच अनुषंगातून प्राचीन मनुष्य संस्कृतीने परंपरांच्या माध्यमातून चालीरीतींमध्ये निसर्गस्नेही सभ्यता रुजविण्याची सहिष्णुता दाखवली. व्यवसाय, राहणीमान, भक्तीपरंपरा, खाद्य संस्कृती वगैरे निसर्ग, तसेच पर्यावरणाला पोषक व सहाय्यक असायच्या. कालपरत्वे हे सगळं कालबाह्य ठरत गेलं आणि आज चीनच्या वुहान शहरातील ‘वेट मार्केट’मध्ये मांसाहारासाठी विकले जाणारे अनेकाविध दुर्मिळ प्राणी बघितल्यावर विचार येतो की कोरोना हे प्राण्यांनीच स्वत:च्या बचावासाठी सोडलेले एक अस्त्र असावे.
पृथ्वी हे निसर्ग जीवनाचे घर आणि यावर जन्माला येणारा प्रत्येक जीव हा इथे काही दिवसांच्या वास्तव्यासाठी येणारा पाहुणा होय. आता यजमानाघरी पाहुण्याने काही शिष्टाचार पाळणे अपेक्षित असताना मनुष्य अतिशय मनमानी पद्धतीने दुसल्याच्या मालकीहक्कावर आपला अधिकार प्रस्थापित करण्याची अरेरावी करत आला आहे. अतिक्रमणाच्या अतिरेकातून तो हळूहळू पर्यावरणातील प्रत्येक परिसंस्थेत आपली विनाकारण ढवळाढवळ करत आहे. त्यामुळे नैसर्गिकतेवर होणार्या प्रतिकूल परिणामांची नुकसानकारक झळ येथील जीवसृष्टीमधील प्रत्येक प्राणी जीवनाला बसत आहे. वाढता उपभोक्तावाद, औद्योगिक स्पर्धा, बदललेले राहणीमान हे आजच्या प्रदुषणाला अधिकाधिक गंभीर होण्यास उत्तेजनच् देत आहेत. ही मानवनिर्मित प्रदुषके हवेतून, पाण्यातून, जमिनीतून, वनस्पतीमधून, प्राणी-पक्ष्यांतून माणसा-माणसात संचार करत आहेत. नवनवीन विषाणू आणि जीवाणूंची निर्मिती हा याच भीषण प्रदुषणाचा परिणाम आहे.
पूर्वनियोजित असल्यागत दरवर्षी नित्यनेमाने जंगलांना आगी लागतात. त्यात शेकडो वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या अनेकविध प्रजातींची समृद्ध जैवविविधता भस्मसात होत आहे. रात्रीच्या अंधारात कुणालाही थांगपत्ता लागू न देता युध्दपातळीवर खाडय़ा, पाणथळ जमिनी, समुद्रकिनारे बुझण्याचे, तेथे भराव टाकण्याचे , तसेच खारफुटी जंगले तोडण्याचे कार्य अविरत आणि बिनधोकपणे चालू आहेत. या मोकळय़ा जागांवर नंतर रहिवासी आणि औद्योगिक प्रकल्प उभे राहत आले आहेत. माणसाच्या या स्वार्थातून जमीन आणि पाण्यातील इतर सजिवांची जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. त्यातून पर्यावरणाची जी अपरिमित हानी होत आहे त्यामुळे मनुष्याचे स्वत:चे भविष्यदेखील धोक्यात आले आहे. पण त्याची जाणीव माणसाला आहे कुठे?
‘जागतिक तापमान वाढ’ ही मनुष्याच्या अयोग्य कर्मांचीच एक उत्पत्ती आहे जी आज या पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी संहारक बनू पाहत आहे. या तापमानवाढीला वेळीच न रोखल्यास अगणित जीवांचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. यातून येणारा जलप्रलय मानवाला जलसमाधी देण्यास कारणीभूत ठरणार आहे. सतत बदलत असलेले निसर्ग व जीवनचक्र या त्याच्या विध्वंसक पाऊलखुणाच आहेत. एकूणच काय तर माणसाने स्वत:च्या सोयीखातर निसर्ग बदलण्याचा वा त्यावर अधिपत्य गाजविण्याचा अविवेक अद्यापही न थांबविल्यास जीवसृष्टीचा नाश अटळ आहे. निर्सग नियमांचे उल्लंघन, नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ करण्याचा एक परिणाम आज आपल्याला ‘कोरोना’च्या रुपात समोर आला आहे. आणि तो किती जीवघेणा आहे हे आपण सगळेच अनुभवत आहोत. निदान यातून तरी प्रत्येकाने भविष्यासाठी काहीतरी बोध घेणे अपेक्षित आहे.
निसर्ग-पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांबरोबरच्या सुखी, समाधानी सहजीवनातच प्रत्येकाची उन्नती व प्रगती असणार आहे. माणसाने स्वत:च्या गरजा कमी करण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी स्वत:वर स्वखुशीने काही बंधने, मर्यादा घातल्या पाहिजेत. काटकसरीची शिस्त व सवय अंगिकारणे अत्यावश्यक आहे. लोकसंख्या आटोक्यात ठेवल्याविना निसर्ग व मनुष्यामधील द्वंद्व संपणार नाही. साधनसंपत्तीचे शोषण व अपव्यय रोखण्यासाठी आपण आपल्या गरजा कमी करणे व उपभोगाचा हव्यास आवरणे आवश्यक आहे. माणसामधील बहुतेक विकारांचे मूळ हे पर्यावरणीय प्रदुषणात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकारचे प्रदूषण परिणामकारक प्रमाणात कमी करणे ही आपली प्राथमिकता असावयास हवी. प्लॅस्टिकवर बंदी गरजेची आहे. पर्यावरणस्नेही इंधन व वस्तूंचीदेखील उपलब्धता करून देण्याची तातडीची आवश्यकता आहे. तंत्रज्ञाननिर्मितीदेखील पर्यावरण सुरक्षेला ध्यानात ठेवूनच होणे योग्य होणार आहे. हरीत क्षेत्र वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. वनक्षेत्रातील मानवी अतिक्रमण रोखणे, प्राणी-पक्षांची शिकार व व्यापार पूर्णत: थांबवणे, वन्यजीवांसाठी आणखी अभयारण्ये उभारणे, बेलगाम मासेमारीला आवर घालणे, पर्यावरणाला निरोगी, समृद्ध, शुद्ध, सुरक्षित ठेवणार्या परिसंस्थांचे काटेकोर रक्षण करणे असे उपाय माणसने त्वरित योजायला हवेत. त्या दृष्टीने प्रामाणिक व जलद पावले पडल्यास आजच्या कोरोना लाँक डाऊनच्या निमित्ताने अनुभवास दिसणारा पर्यावरणातील सकारात्मक बदल हा आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळेल. अर्थात, कोरोना लॉक डाऊन संपल्यानंतर माणूस आणि त्याच्या जुन्या सवयी पुन्हा पूर्वपदावर आल्या तर आज पर्यावरणात दिसणारा चांगला बदल तात्पुरताच ठरेल.
























































