
कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आता शहरातील हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने उघडायला मुंबई महानगरपालिकेने गुरुवारपासून परवानगी दिली आहे. याआधी केवळ जीवनावश्यक वस्तू आणि औषधांच्या दुकानांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गर्दी टाळण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. वरळी, धारावी आणि ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे अशा ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. अन्नधान्य, दूध, औषधांची दुकाने सोडल्यास इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, आता हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने उघडायलाही पालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. आरोग्य यंत्रणा, मशीन्स आणि वाहनांसाठी लागणारी आयटी सिस्टीम तसेच अत्यावश्यक आणि जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून एका रस्त्यावरील एक हार्डवेअर आणि एक इलेक्ट्रॉनिक अशी दोन दुकाने उघडायला पालिकेने परवानगी दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढण्यात आला.
दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटल्यानंतर हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने उघडणार असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. पंखे, वायर, दिवे, मोठ्या बॅटरी किंवा गॅस गिझरचे सेल, टीव्ही, मोबाईल आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध होणार आहेत.



























































