
कोल्हापूरात 14 पैकी 9 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने चालली असतानाच,आजरा तालुक्यात आई आणि मुलगा तर चंदगड तालुक्यात एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी मध्यरात्री स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण मुंबई येथून आले आहेत. एकाच दिवशी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले असले तरी वस्तुस्थिती जाहिर करण्यात पुन्हा एकदा टाळाटाळ होत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई पोलिस दलात पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी करणाऱ्या 41 वर्षीय महिलेच्या 21 वर्षाच्या मुलाचे निधन झाले. त्याचा मृतदेह घेऊन 19 वर्षाचा मुलगा आणि काही नातेवाईकांसह ही महिला आजरा तालुक्यातील हारुर या गावी या आठवड्याभरात आली होती. मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर बुधवारी गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालयात या सर्वांचे स्वॅब तपासणीस पाठविण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात ही महिला आणि तिचा 19 वर्षाचा मुलगा हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाबरोबरच चंदगड तालुक्यातील अलबादेवी या गावातील 21 वर्षीय तरुणही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. हा तरुण सुद्धा मुंबई येथून आल्याची माहिती समोर येत आहे. काच दिवशी जिल्ह्यात तीन कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.






























































