
उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता गेल्या पंचवीस वर्षापासून फुलशेती करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील गोविंद जाधव या शेतकऱ्याची कोरोनाने कशी दुरावस्था केली आहे. हे विदारक चित्र त्या शेतकऱ्याच्या फुलशेतावरून दिसून येते. गुलाब, गलांडा आणि बिजली या फुलांची मुक्त शेती करत जरबेरा फुलासाठी लाखो रूपये खर्च करून पॉलीहाऊस उभारले. बहारदार फुले बहरली. मात्र बहरलेली फुले कोरोनामुळे लग्न समारंभ, वाढदिवस, किंवा शुभेच्छांसाठी वापरली न जाता मातीत मिसळत आहेत.
गोविंद जाधव यांनी आपल्या शेतात राबराब राबून फुलशेती फुलवली. तब्बल सोळा लाख रूपये खर्च करून पॉलीहाऊस उभारले. त्यात सहा हजार जरबेरा फुलांच्या झाडांची लागवड केली. पॉलीहाऊस उभारण्यासाठी अकरा लाख रूपयाचे कर्ज काढले. केवळ बँकेच्या कर्जावर फुलशेती करणे परवडणारे नव्हते म्हणून आई गयाबाई जाधव यांनी आपल्या अंगावरील सोने मोडून पॉलीहाऊस उभारण्यासाठी मदत केली. जाधव कुटुंबीयांनी मोठी मेहनत घेतली, परिश्रमाचं चीज झालं असे वाटत असतानाच कोरोनाच्या संकटाने फुलशेतीवर अक्षरश: नांगर फिरविला. जरबेराची लोभसवाणे फुल बघणाऱ्यांना नक्की भुरळ घातल्याशिवाय राहत नव्हती. पण आता या फुलांनी उमलूच नये असे म्हणण्याची वेळ आली. कारण या उमलेल्या प्रत्येक फुलाला परत मातीतच जावे लागणार आहे. एरव्ही या फुलांना अलगद तोडताना त्या फुलाला इजा पोहचणार नाही याची काळजी घेणाऱ्या गयाबाई जाधव आता रोज आपल्या जड पावलाने फुलांना शेताच्या बांधावर नेऊन पोहचवत आहेत. लॉकडाऊनमुळे फुल खरेदीसाठी व्यापारी फिरकेनात, मार्केट नष्ट झाले. केलेला खर्च वाया गेला. जरबेराच नव्हे तर गुलाब, शेवंती फुलांची झाडेही तोडून आता बांधावर टाकावी लागत आहेत.
फुल व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी गुढीपाडवा हा मुहुर्त शुभ मानला जातो. म्हणून गोविंद जाधव यांनी आपल्याकडील जरबेरा फुलांची विक्री करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहुर्त ठरवला होता. केलेल्या परिश्रमाचे चीज होणार होते. उचललेले कर्ज हळूहळू फेडले जाणार होते. आईने मोडलेले दागिनेही या पैशात पुन्हा घ्यायचे होते. मात्र तिकडे लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि फुलांची मागणी बंद झाली. ज्या पाडव्याच्या दिवशी या फुलाला देव्हाऱ्यामध्ये जागा द्यायची होती त्याच दिवशी फुलांना आणि फुलांच्या झाडांना बांधावर फेकून द्यावे लागले. तेव्हापासून रोज 800 ते 1200 फुलांचं उत्पादन होत आहे. दीड महिन्यापासून फुलतोडणी चालू आहे. दर चार दिवसाला फुल तोडून बांधावर नेवून टाकावे लागत आहे यातील एकही फुल विकले गेले नाही. जाधव कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या काही महिन्यापासून दिवस रात्र केलेल्या मेहनतीवर कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले.
























































