
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अजित गोपछडे यांचा अर्ज नाट्यमयरित्या मागे घेण्यात आला, आणि डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज अधिकृत उमेदवार म्हणून कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपमधील असंतोष पुन्हा एकदा बाहेर आला आहे. विधानसभेची निवडणूक 21 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या मावळत्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसच्या वतीने राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि डॉक्टर अजित गोपछडे या चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर डमी उमेदवार म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांनी अर्ज दाखल केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले होते
रमेश कराड यांना उमेदवारी का दिली
विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे कमालीचा नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रमेश कराड यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील कमालीचे नाराज आहेत. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे एकत्र येऊन पक्षासमोर नवीन आव्हाने निर्माण करू नये म्हणून रमेश कराड यांना उमेदवारी देऊन पंकजा यांचे बंड थोपवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.























































