हिंगोलीत चौथ्या दिवशीही वजाबाकी, 2 एसआरपीएफ जवानाना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची सलग चौथ्या दिवशी देखील वजाबाकी झाली आहे. आज 14 मे रोजी हिंगोली व जालना येथील प्रत्येकी एका एसआरपीएफ जवानाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, या दोन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले की नाही याबाबतची स्पष्टता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली नाही.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 11 मे पासून कोरणा बाधित रुग्णांची संख्या घटत असून कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. 11 मे ते आज 14 मे पर्यंत एकूण 45 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या हिंगोली येथील एक व जालना येथून हिंगोली तालुक्यातील गावाकडे आलेल्या एसआरपीएफ जवानाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, या दोन जवानांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत की नाही याबाबत प्रसिद्धीपत्रकात आरोग्य विभागाने कोणताही उल्लेख केला नाही.

दरम्यान, आयसोलेशन वॉर्डासह विलगीकरण कक्षामध्ये 1 हजार 418 जणांना भरती करण्यात आले होते. यापैकी 1 हजार 307 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन 1 हजार 280 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या विलगीकरण कक्षात 129 जण भरती आहेत.  तर 21 जनांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 91 जणांचे अहवाल पॉझिटिव आले असून त्यापैकी 48 जणांनी कोरोनावर विजय मिळवल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नऊ रूग्णांवर संभाजीनगरात उपचार सुरू असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक परिचारिका आणि 33 एसआरपीएफ जवानांवर हिंगोलीत उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 43 आहे.