
कोरोनाच्या संकटामुळं उद्योगजगत जसं डबघाईस आलं, त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राचीही मोठी आर्थिक हानी झाली आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं यावर्षी सुमारे सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे फक्त राज्यातल्याच नाही तर देशा-विदेशातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. उन्हाळ्यामध्ये देश-विदेशातील पर्यटकांच्या उपस्थितीनं हा प्रकल्प फुललेला असायचा. साधारणपणे डिसेंबरपासून इथली वर्दळ वाढायची आणि 31 मेपर्यंत पर्यटकांची संख्या कायम असायची. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळं हा प्रकल्प 18 मार्च रोजी बंद करण्यात आला. त्यामुळं प्रकल्पाचा पर्यटकांसाठीच्या तिकीट विक्रीतून आणि इतर माध्यमातून गोळा होणारा 6 कोटींचा महसूल बुडाल्याचा अंदाज आहे. प्रकल्पातील टुरिस्ट गाईड, रिसॉर्ट, जिप्सी यांचा व्यवसायही बुडाला आहे. त्यांच्यासाठी सहा महिन्यांचा काळ हा उत्पन्न कमावण्यासाठीचा काळ असतो. मात्र कोरोनामुळे त्यांच्यावरही संकट ओढावलं आहे.
प्रकल्प केव्हा सुरू होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. ताडोबा व्यवस्थापणानं घरबसल्या पर्यटकांना प्रकल्प पाहता यावा, वाघ पाहाता यावे यासाठी यू ट्यूबवर लाईव्हची व्यवस्था केली आहे. याद्वार आनंद पर्यटक घेत आहेत. मात्र त्यातून महसूली उत्पन्न होत नाहीये. गेल्या वर्षी या प्रकल्पातून 12 कोटींचा महसूल जमा झाला होता.





























































