जालन्यातील अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मदतीला शिवसेना धावली, एक लाख रुपयांची केली मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील अल्पभुधारक शेतकऱ्याचे कुकुटपालनासाठी बनवलेले शेड उडाले. त्यामुळे या शेड खाली असलेले तब्बल दीड हजार गावरान कोंबड्या व दीड हजार ब्रॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या सर्वामुळे शेतकऱ्याचे तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानामुळे हतबल झालेल्या त्या शेतकऱ्याच्या मदतीला शिवसेना धावून आली. असून शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनी त्या शेतकऱ्याला जिल्हा परिषद शेष फंडातून एक लाख रुपये तत्काळ मिळवून दिले. या कठिण काळात शिवसेनेने केलेल्या या मदतीमुळे शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले होते.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे शिवसेना तालुक्यात काम करत असते. बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात गट क्रमांक २५३ मधील अल्पभूधारक शेतकरी विष्णू रामभाऊ काकडे यांनी जोडव्यवसाय म्हणून तीन शेड उभारून कुकुटपालन सुरू केलेले होते. परंतु या पावसात हे शेड उडून दीड हजार गावरान कोंबड्या व दीड हजार ब्रॉयलर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. काकडे यांनी नातलग, मित्रपरिवार व काही खाजगी लोकांकडून जवळपास 10 लाख रुपये जमा करून हा कुकुटपालन व्यवसाय सुरू केलेला होता. परंतु आलेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्यामुळे काकडे हे आर्थिक विंवचेणत होते. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांना कळताच त्यांनी तत्काळ या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अयोध्या चव्हाण यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून 1 लाख रुपयांची मदत शेतकऱ्याला दिली. या रकमेतून या शेतकऱ्याला आर्थीक आधार झाला आहे. यावेळी सरपंच भाऊसाहेब वैद्य, उपसरपंच तातेराव शेळके, माजी सरपंच नारायण हाकवणे, सतीष हाकवणे, राम वैद्य, माऊली पवार, वैद्य आदींची उपस्थिती होती.